

गोकुळाष्टमीनिमित्त नवी मुंबईतील बाजारपेठा सजल्या
नेरूळ, ता. ३० (बातमीदार) ः अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त घराघरांत लाडक्या श्रीकृष्णाच्या आगमनासाठी तयारीला उधाण आले आहे. नवी मुंबईतील बाजारपेठा विविध सजावट आणि पूजेच्या साहित्याने सजल्या असून ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी आणि गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी बाजारपेठांमध्ये आकर्षक सजावटीचे साहित्य, पूजेच्या वस्तू तसेच दहीहंडीचे साहित्य उपलब्ध झाले आहे. श्रीकृष्णाच्या मूर्ती, बाळकृष्णाची वेशभूषा, मोरपिसांचा मुकुट, बासरी, झोका, मातीची मडकी, फुलांच्या माळा, तोरणे, राधा-कृष्णाच्या सजावटीच्या वस्तू, रंगीत कागदी सजावट तसेच पूजेचे साहित्य दुकानांमध्ये पाहायला मिळत आहे. सजावटीच्या वस्तूंना विशेष मागणी असून, साध्या साहित्यापासून आकर्षक आणि महागड्या सजावटीच्या वस्तूंपर्यंत विविध पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहेत.
गोकुळाष्टमी साहित्याचे अंदाजे दर
साहित्य अंदाजे किंमत
बाळकृष्णाची छोटी मूर्ती १०० ते ५००
श्रीकृष्णाची सजावटीची मूर्ती २०० ते १,०००
मोरपिसांचा मुकुट ५० ते २००
बासरी ३० ते १५०
मातीचे मडके, हंडी १५० ते ५००
कृष्णासाठी झोका १५० ते ६००
फुलांच्या माळा ३० ते १५०
सजावटीचे तोरण ५० ते २५०
राधा-कृष्ण सजावट संच २०० ते ८००
बाळकृष्ण वेशभूषा १५० ते ८००
दहीहंडी १०० ते ५००
हंडी सजावट १०० ते ५००
पूजेचा साहित्य संच १०० ते ४००
लहान मुलांकरिता गोकुळाष्टमीनिमित्त विविध पर्याय उपलब्ध
गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील बाजारपेठांमध्ये लहान मुलांसाठी विविध आकर्षक वेशभूषेचे पर्याय उपलब्ध झाले असून, या कपड्यांना पालकांकडून मोठी मागणी होत आहे. शहरातील अनेक शाळांमध्ये गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचे कार्यक्रम आयोजित केले जात असल्याने बाळगोपाळांना श्रीकृष्ण, राधा तसेच गोप-गोपींच्या वेशभूषेत सजविण्यासाठी पालकांची खरेदीची लगबग सुरू झाली आहे.
लहान मुलांसाठी बाळकृष्णाचा पोशाख, धोतर-कुर्ता, कुर्ता-पायजमा, श्रीकृष्णाचा मुकुट, मोरपीस, बासरी आदी विविध साहित्य बाजारात उपलब्ध आहे. तर मुलींसाठी राधा पोशाख, घागरा-चोळी, लेहंगा-चोळी, पारंपरिक पोशाख, दागिने आणि आकर्षक मुकुट असे विविध पर्याय दुकानदारांनी उपलब्ध करून दिले आहेत.
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने बाजारात श्रीकृष्णाला सजवण्यासाठी विविध वस्तू ५० रुपयांपासून उपलब्ध आहेत. श्रीकृष्णाची बासरी, मुकुट, मोरपीस, कपडे यांना विशेष मागणी आहे. गोकुळाष्टमीला शाळांकडून विद्यार्थ्यांना पारंपरिक वेशभूषेत येण्यास सांगितले जात असल्याने पुढील काही दिवसांत या कपड्यांची विक्री आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये सध्या गोकुळाष्टमीच्या साहित्याबरोबरच बाळगोपाळांच्या वेशभूषेचीही रंगत पाहायला मिळत आहे.
- नरेश लक्ष्मण कोकाटे, विक्रेते, नेरूळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.