पावसाची ‘वर्षा मॅरेथॉन’

पावसाची ‘वर्षा मॅरेथॉन’
Published on

पंकज रोडेकर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : महापालिकेच्या महापौर वर्षा मॅरेथॉनची चर्चा सुरू असतानाच यंदाच्या पावसानेही जणू नोंदींचीच ‘मॅरेथॉन’ धावली. सुरुवातीला उशिरा दाखल झालेल्या पावसाने नंतर जोर पकडत यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत तब्बल २,५२४.७३ मिमी पावसाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या २,५१५.११ मिमी पावसाची नोंद यंदा मागे पडली आहे. त्यामुळे पावसाच्या आकडेवारीतही ‘स्पर्धा’ पाहायला मिळाली.

यंदाच्या पावसाळ्याची सुरुवात काहीशी संथ झाली होती. त्यामुळे यंदा पावसाची सरासरी गतवर्षीच्या तुलनेत कमी राहणार की काय, अशी चर्चा होती. मात्र, त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावत ही कसर भरून काढली. विशेषतः जुलै आणि ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे हंगामाची एकूण नोंद सातत्याने वाढत गेली.

जुलैच्या पावसाने भरपाई
जूनमध्ये गतवर्षीच्या तुलनेत पावसाने पाठ फिरवली असली तरी जुलैमध्ये मुसळधार बरसत यंदाच्या पर्जन्यमानाची मोठी भरपाई केली. जूनअखेर यंदा ४११.३४ मिमी पाऊस झाला होता; मात्र जुलैमध्ये तब्बल २,०८३.७४ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे ५२७.८१ मिमी आघाडी घेऊन ही ऑगस्टमध्ये यंदाचे हंगामी पर्जन्यमान २,५२४.७३ मिमीवर पोहोचले आहे. गतवर्षी ऑगस्टअखेर २५१५.११ मिमी पाऊस झाला होता. म्हणजेच यंदा आतापर्यंत ९.६२ मिमी अधिक पाऊस नोंदला गेला आहे. रविवारी (ता. ३०) सकाळपर्यंत २४ तासांत केवळ ४.३२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे पावसाचा जोर आता ओसरल्याचे चित्र आहे.

पावसाच्या दिवसांत मोठी घट
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे दिवस कमी झाले आहेत. जूनमध्ये तब्बल १९ दिवसांनी, जुलैमध्ये सहा दिवसांनी, तर ऑगस्टमध्ये एका दिवसाने पावसाच्या दिवसांत घट झाली आहे. विशेष म्हणजे २०२६च्या जूनमध्ये यंदा केवळ आठ दिवस पावसाची नोंद झाली, तर गतवर्षी २७ दिवस पाऊस पडला होता. त्यामुळे पावसाचे दिवस घटले असले तरी काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे हंगामी पर्जन्यमान मात्र समाधानकारक राहिले आहे. मागील दहा वर्षांच्या इतिहासात यंदा जून महिन्यात अवघा आठ दिवसच पाऊस झाल्याचे आकडेवारीनुसार दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com