‘रिंग मेट्रो’विरोधात हजार स्वाक्षऱ्या

‘रिंग मेट्रो’विरोधात हजार स्वाक्षऱ्या
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : प्रस्तावित अंतर्गत रिंग मेट्रोला विरोध करण्यासाठी पोखरण रोड क्रमांक दोन येथे आज (ता. ३०) नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवली. ठाणे अगेन्स्ट इंटिग्रल रिंग मेट्रो या नागरिक मंचाच्या वतीने आयोजित या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गतिमान ठाण्याची हाक देत सकाळी महापौर वर्षा मॅरेथॉन सुरू असताना दुसरीकडे मात्र एक हजारांहून अधिक ठाणेकरांनी स्वाक्षरी करून रिंग मेट्रो प्रकल्पाला ब्रेक लावण्यासाठी कडाडून विरोध नोंदविला.

ठाण्याची अंतर्गत वाहतूक कोंडी दूर व्हावी, यासाठी मुख्य मेट्रो चार अ प्रकल्पाला जोड म्हणून अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प आकार घेणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर झाला आहे; मात्र १२ हजार कोटींचा हा प्रकल्प पहिल्या दिवसापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शेंदणी कोळीवाड्यापासून ते घोडबंदरपर्यंत नागरिकांचा विरोध वाढत आहे. हा विरोध अधिक मजबूत करण्यासाठी विविध पातळीवर आंदोलने उभारण्यात येत आहेत. त्यानुसार ॲड. राधिका राणे आणि आदेश म्हेरोत्रा यांच्या आयोजनाखाली पोखरण रोड क्रमांक दोन येथे रविवारी सकाळी स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती.

प्रस्तावित रिंग मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील कोंडी वाढण्याची, पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होण्याची तसेच सार्वजनिक निधीचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. हजारो झाडांची कत्तल करून राबविण्यात येणारा हा प्रकल्प तत्काळ रद्द करावा आणि नागरिकांच्या सूचनांचा सन्मान करावा, अशी मागणी मंचाच्या वतीने करण्यात आली.

पोखरण रोडवर एक हजारांहून अधिक नागरिकांनी केलेल्या स्वाक्षऱ्यांमधून ठाणेकरांना ही अंतर्गत रिंग मेट्रो नको असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकल्प म्हणजे नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी आणि हिरव्यागार पर्यावरणाचा विनाश आहे, असे ॲड. राधिका राणे यांनी सांगितले.

जनआंदोलनाचा इशारा
ठाणेकरांच्या मूलभूत समस्या सोडविण्याऐवजी आमच्यावर हा अनावश्यक प्रकल्प लादला जात आहे. प्रशासनाने नागरिकांचा हा स्पष्ट विरोध ओळखून प्रकल्पाचे काम तातडीने थांबवावे, अन्यथा आगामी काळात हे जनआंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा आदेश म्हेरोत्रा यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com