नवीन गृहप्रकल्पांना पाण्याचे नियोजन शून्य

नवीन गृहप्रकल्पांना पाण्याचे नियोजन शून्य
Published on

नवीन गृहप्रकल्पांसाठी पाण्याचे नियोजन शून्य
सिडकोच्या कारभारावर रहिवाशांचा तीव्र संताप
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३० : नवी मुंबईतील वेगाने विकसित होणाऱ्या खारघर आणि तळोजा (फेज १ आणि फेज २) नोडमध्ये सिडकोकडून हजारो सदनिकांचे गृहप्रकल्प आणि खासगी इमारती उभारल्या जात आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला या नव्या इमारतींमधील रहिवाशांसाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत पाणीपुरवठ्याचे कोणतेही ठोस नियोजन सिडकोकडे नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. आधीच अस्तित्वात असलेल्या वसाहतींना पिण्याचे पाणी पुरवताना प्रशासनाची दमछाक होत असताना, पाण्याचे ठोस नियोजन न करताच नव्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रे दिली जात असल्याने तळोजा व खारघर परिसरात पाण्याचे संकट गंभीर रूप धारण करीत आहे.
सिडकोने खारघर, रोडपाली, द्रोणागिरी आणि तळोजा भागात नवीन गृहप्रकल्प आखताना आवश्यक असणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा कोटा उपलब्धतेचे नियोजन कागदावरच ठेवले आहे. कोंढाणे धरण प्रकल्प अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे, तर न्हावा-शेवा टप्पा-३ योजनेचे काम रखडल्यामुळे तातडीने अतिरिक्त पाणी मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. इमारतींचे बांधकाम आणि ताबा देण्याची प्रक्रिया जलद गतीने पार पाडली गेली; परंतु त्या तुलनेत मुख्य जलवाहिन्या टाकणे, नवीन जलकुंभ उभारणे आणि वितरण जाळे विस्तारणे या कामांकडे सिडकोच्या अभियांत्रिकी विभागाने दुर्लक्ष केले आहे. तळोजा नोडची सध्याची पाण्याची दैनंदिन मागणी सुमारे ५५ ते ६५ एमएलडी आहे, तर प्रत्यक्ष पुरवठा अवघा ३५ ते ४० एमएलडी होतो. सुमारे १५ ते २५ एमएलडीचा तुटवडा असताना नवीन हजारो कुटुंबांना या नोडमध्ये वास्तव्यासाठी आमंत्रित केले गेले. यामुळे उपलब्ध पाण्याचे वाटप आणखी विस्कळित झाले. नवीन गृहनिर्माण संकुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आणि एमआयडीसी आणि हेटवणेच्या पाणीपुरवठ्यात वारंवार चढ-उतार होत असल्याने या भागात पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. केवळ खारघर आणि तळोजा या दोन नोड्सचा विचार केल्यास दररोज ४० ते ६० एमएलडी (सुमारे ४ ते ६ कोटी लिटर) पाण्याचा मोठा तुटवडा आहे. उंचावरील भाग आणि जलवाहिनीच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सोसायट्यांमध्ये कमी दाबाने पाणी येते किंवा अनेकदा पाणीच पोहोचत नाही. एमआयडीसीकडून मिळणारा पाणीपुरवठा, सिडकोचे अंतर्गत वितरण आणि पनवेल महापालिकेकडे हस्तांतरणाची प्रक्रिया या त्रिकोणात पाण्याचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. पाणी उपलब्ध नसताना इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र कसे दिले जाते, असा प्रशासकीय सवालही आता उपस्थित केला जात आहे.

टँकर लॉबी फोफावली, रहिवाशांची आर्थिक लूट
सिडकोकडून पुरेसे पाणी मिळत नसल्याने नवीन सोसायट्यांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी खासगी टँकरवर विसंबून राहावे लागत आहे. एका सोसायटीला महिन्याकाठी टँकरपोटी लाखो रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. घर खरेदी करताना पाण्याचे आश्वासन देणारे सिडको प्रशासन आता हतबलता दाखवत आहे, असा संताप नवीन रहिवाशांकडून व्यक्त केला जात आहे. तळोजा नोडला सध्या खारघरचे पाणी वळवले जात असल्याचे समजले आहे. त्यामुळे खारघरमधील स्वप्नपूर्ती आणि व्हॅली शिल्पसारख्या घरांची संख्या असणाऱ्या संकुलांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

खारघर आणि तळोजा नोडमधील पाण्याचा ताळेबंद
खारघर नोड
दैनंदिन मागणी : सुमारे ११० ते १२५ एमएलडी (दशलक्ष लिटर)
प्रत्यक्ष पुरवठा : सुमारे ८५ ते ९० एमएलडी (हेटवणे आणि मोरबे धरणातून मिळून)
दररोजचा तुटवडा : २५ ते ३५ एमएलडी

तळोजा नोड (फेज १ आणि फेज २)
दैनंदिन मागणी : सुमारे ५५ ते ६५ एमएलडी
प्रत्यक्ष पुरवठा : सुमारे ३५ ते ४० एमएलडी
दररोजचा तुटवडा : १५ ते २५ एमएलडी


नवी मुंबईची टाळाटाळ
नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणातून खारघरसाठी नियोजित आरक्षित कोट्यापेक्षा कमी पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे खारघरसाठी सिडकोला १५ एमएलडी पाणी कमी पडत आहे. वारंवार नोटीस देऊनही पाणीपुरवठा करण्यास महापालिका टाळाटाळ करीत असल्याने खारघरमध्ये आजही पाणीकपात सुरू आहे.

पनवेलमधील राजकारण्यांना अपयश
पनवेलचा पाणीप्रश्न सोडवण्यात येथील सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. पाणीटंचाई असताना दुसरीकडे इमारतीची बेसुमार बांधकामे थांबवण्यात राजकारण्यांना यश आले नाही. शेजारची महापालिका एकाच पक्षाच्या सत्तेखाली असूनदेखील सिडको वसाहतींना पाणी आणता येत नसल्याने सिडको वसाहतीमध्ये राहणारे रहिवासी हवालदिल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com