

शेलघरचा विकास राज्यासाठी आदर्श
राजकीय इच्छाशक्ती, दर्जेदार कामे आणि क्रीडा संस्कृतीमुळे गावाची वेगळी ओळख
नवी मुंबई, ता. ३० : उलवे परिसरातील शेलघर गावाने विकासाची नवी दिशा निर्माण केली असून, रायगडासह महाराष्ट्रासाठी ते आदर्श ठरत आहे. पायाभूत सुविधांसोबतच ग्रामस्थांच्या दैनंदिन गरजा, आरोग्य, सामाजिक सलोखा आणि क्रीडा संस्कृतीला प्राधान्य देत गावाचा विकास करण्यात आला आहे. राजकीय इच्छाशक्ती, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि दर्जेदार कामांच्या जोरावर सामान्य गावाचे रूप कसे बदलू शकते, याचे उदाहरण शेलघरने निर्माण केले आहे.
महेश स्पोर्टस् जिमच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय कामगार नेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्र घरत यांनी गावाच्या विकासाचा आढावा घेतला. वातानुकूलित समाजमंदिरामुळे ग्रामस्थांना विविध कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रम विनामूल्य घेता येतात. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या महेश स्पोर्टस् जिममध्ये स्थानिक तरुणांना मोफत, तर परिसरातील युवक-युवतींना नाममात्र शुल्कात व्यायाम व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे शेलघरमधील तरुणांनी शरीरसौष्ठव आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिममधील एका युवा खेळाडूला क्रिकेट लिलावात तब्बल १७ लाखांची बोली मिळाल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमात अमित नाईक आणि रायगड मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. सीमा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी महेंद्र घरत यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य करीत लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन केले.
आरोग्य, क्रीडा क्षेत्रातील सहभागाला प्राधान्य
शेलघरच्या विकासात केवळ रस्ते, इमारती आणि इतर पायाभूत सुविधांपुरते नियोजन मर्यादित ठेवण्यात आलेले नाही. तरुणांचे आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढविण्यासाठी महेश स्पोर्टस् जिमच्या माध्यमातून सातत्याने प्रशिक्षण दिले जात आहे. स्थानिक तरुणांना मोफत सुविधा मिळत असल्याने आर्थिक अडचणी असलेल्या युवकांनाही चांगले प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. या प्रयत्नांतून शेलघरमधील खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये आपली क्षमता सिद्ध केली असून, गावाचे नाव क्रीडा क्षेत्रात पुढे येत आहे. त्यामुळे आरोग्य, सामाजिक सुविधा आणि क्रीडा विकास यांचा समन्वय साधणारे शेलघर इतर गावांसाठी अनुकरणीय ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.