

ट्रॉमा रुग्णालयातील मेंदुविकार उपचारांना मिळणार बळ
तज्ज्ञ मनुष्यबळ वाढवण्याची प्रक्रिया सुरू; अत्याधुनिक उपकरणांचा प्रभावी वापर करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : अपघातानंतर डोक्याला झालेली गंभीर दुखापत, पक्षाघात तसेच विविध मेंदुविकारांच्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयातील मेंदुविकार विभागाची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध असली, तरी त्यांचा पुरेपूर वापर करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यावर सध्या भर दिला जात आहे.
बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालय कूपर रुग्णालयाशी संलग्न असल्याने दोन्ही रुग्णालयांमध्ये मेंदूविकार तज्ज्ञांची सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे पश्चिम उपनगरांतील रुग्णांसह पालघर आणि गुजरातच्या सीमावर्ती भागातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना स्थानिक पातळीवर उपचार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
मेंदुविकाराच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधण्यात आला असून, काही डॉक्टर रुजू झाले आहेत. उपलब्ध सुविधांचा अधिक प्रभावी वापर करून रुग्णसेवा वाढविण्यावर भर आहे, अशी प्रतिक्रिया कूपर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे यांनी दिली.
दररोज १०० ते १५० रुग्ण
ट्रॉमा रुग्णालयातील मेंदुविकार विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज सुमारे १०० ते १५० रुग्ण उपचारासाठी येतात. यामध्ये पक्षाघाताबरोबरच उच्च रक्तदाब आणि मधुमेहामुळे मेंदू व रक्तवाहिन्यांवर परिणाम झालेल्या रुग्णांचे प्रमाणही आहे. विशेषतः पक्षाघाताच्या रुग्णांमध्ये उपचाराला होणारा प्रत्येक विलंब महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे रुग्ण दाखल झाल्यानंतर तपासणी, निदान आणि उपचाराची प्रक्रिया जलद होण्यासाठी पुरेसे तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध असणे आवश्यक आहे. मनुष्यबळ वाढल्यास सध्या उपलब्ध असलेल्या उपकरणांचा अधिक परिणामकारक वापर करणे शक्य होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.