फसवणूक झाली तर गप्प बसू नका!

फसवणूक झाली तर गप्प बसू नका!
Published on

अंबरनाथ, ता. ३१ (वार्ताहर) : संजय प्रसाद आणि तेजस सरोदे यांच्या अटकेनंतर अंबरनाथ शहरातील व्यापारी, बांधकाम व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. या दोघांविरोधात फसवणूक, पैशांचा अपहार, दमदाटी तसेच कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे घेतल्याच्या तक्रारी असल्याचा दावा व्यापारी-बिल्डर असोसिएशनने केला आहे. त्यामुळे अशा प्रकारे फसवणूक झालेल्या नागरिकांनी उपलब्ध पुराव्यांसह पुढे येऊन अंबरनाथ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन असोसिएशनचे पदाधिकारी ज्ञानधर मिश्रा यांनी केले आहे.
मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, काही नागरिकांकडून कर्ज मंजूर करून देण्याच्या नावाखाली पैसे घेण्यात आले. मात्र, पैसे घेतल्यानंतरही संबंधितांना कर्ज मिळाले नसल्याच्या तक्रारी असोसिएशनकडे आल्या आहेत. पैसे परत मागितल्यानंतर दमदाटी केल्याचेही काही तक्रारदारांनी सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.
या तक्रारींच्या अनुषंगाने काही ध्वनिमुद्रित संभाषणे, कागदपत्रे आणि अन्य पुरावे उपलब्ध असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी असोसिएशनच्या एका सदस्यासोबतही अशाच प्रकारचा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावेळी पोलिसांना माहिती देऊन संबंधित पुरावे सादर केल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, प्रसाद आणि सरोदे यांच्याकडून फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार किंवा दमदाटी झालेल्या नागरिकांनी गप्प न बसता पोलिसांत तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारदारांना आवश्यक असल्यास असोसिएशनच्या वतीने शक्य ती कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मिश्रा यांनी सांगितले.
या प्रकरणातील तक्रारी आणि उपलब्ध पुराव्यांची पोलिसांनी सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी व्यापारी-बिल्डर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com