

मुरबाड, ता. १ (वार्ताहर) : तालुक्यातील खुटल (बा.) ग्रामपंचायतीअंतर्गत घरकुल योजनेच्या लाभार्थी निवडीवरून ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. ग्रामसभेत एकूण ३२५ घरकुलांसाठी लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत आधीच पक्की घरे असलेल्या व्यक्तींची नावे समाविष्ट केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तर स्वतःचे घर नसलेल्या आणि प्रत्यक्षात घरकुलाची गरज असलेल्या गरीब कुटुंबांची नावे सर्वेक्षण यादीतून वगळण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, संगणक परिचालक आणि रोजगार सेवक यांच्या नातेवाइकांसह मर्जीतील व्यक्तींचा घरकुलासाठी सर्वेक्षणात समावेश केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. १८ ऑगस्टला झालेल्या ग्रामसभेच्या प्रक्रियेवरही ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. याबाबत त्यांनी भूमिपुत्र एल्गार संघटनेचे ठाणे जिल्हा सरचिटणीस दिनेश जाधव यांची भेट घेऊन तक्रार मांडली. यानंतर संघटनेने पंचायत समिती, मुरबाड येथे धरणे आंदोलन केले. घरकुल लाभार्थी यादीची फेरतपासणी करून प्रत्येक लाभार्थ्याच्या घराची प्रत्यक्ष पाहणी करावी, पक्के घर असलेल्या लाभार्थ्यांची नावे वगळावीत आणि घर नसलेल्या खऱ्या गरजू कुटुंबांचे नव्याने सर्वेक्षण करून त्यांना घरकुलाचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनाची दखल घेत गटविकास अधिकारी लता गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष दीपक वाघचौरे तसेच किसळ ग्रामपंचायतीच्या सरपंच कॉ. कविता वरे यांनी पाठिंबा दिला. यावेळी दिनेश जाधव, सुरज राजपूत, जगदीश शिद, बुधाजी खंडागळे, बाळा दळवी, हरिश्चंद्र पादीर, कैलास खंडागळे, मारुती वाघ, सुरेश मोढवे, तानाजी भला, कांताराम पोकळा, पंढरीनाथ दळवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.