धारावीच्या हंड्यांना मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मागणी

धारावीच्या हंड्यांना मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मागणी
Published on

धारावीच्या हंड्यांना मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मागणी
५० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत मडक्यांची विक्री; कारागिरांची रात्रंदिवस लगबग

संजय शिंदे ः सकाळ वृत्तसेवा
धारावी, ता. ३१ : महाराष्ट्र व खासकरून मुंबई परिसरात गोपाळकाल्यानिमित्त दहीहंडी मोठ्या उत्साहात खेळली जाते. नवतरुणांना आकर्षित करणारा हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. दहीहंडीसाठी लागणारी हंडी अर्थात मडके मोठ्या प्रमाणावर धारावीतून मुंबई व आसपासच्या परिसरात विक्रीसाठी जातात. ५ सप्टेंबरला गोपाळकाला असून धारावी कुंभारवाडा येथे हंडी बनवण्याचे व त्यावर नक्षीकाम तसेच रंगकामाला सध्या जोरदार सुरुवात झाली आहे.
धारावी कुंभारवाडा येथील जवळपास १५० कुंभार कच्ची मडकी बनवून ती भट्टीत भाजून काढत आहेत. तर १०० कुटुंबे या तयार मडक्यांवर रंगकाम व नक्षीकाम करण्यात गुंतली आहेत. मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील किरकोळ विक्रेते धारावी कुंभारवाड्यातून होलसेल भावात हंडीची मडकी अगोदरच ऑर्डर करून ठेवतात. त्याप्रमाणे मागणी तसा पुरवठा केला जातो. किमान पाच पिढ्या हे हंडी बनवण्याचे व विक्रीचे काम करीत आहेत.
मुंबईतील श्रीमंत म्हणवल्या जाणाऱ्या भागातूनही श्रीमंत लोक हंडीची मडकी घेण्यास या ठिकाणी मोठाल्या गाड्यांमधून येतात. यामध्ये कसलीही घासाघीस न करता ग्राहक मडकी विकत घेतात. यामुळे कुंभारांच्या मेहनतीला न्याय मिळतो. आठवडाभरात कुंभारवाड्यात लाखोंचा व्यवहार केला जातो. दहीहंडीच्या कामात संपूर्ण कुटुंब रात्रंदिवस राबत असतात.
तयार मडक्यावर कलाकुसरीचे काम करणारे एक कुटुंब म्हणजे चित्रोडा यांच्या किमान तीन पिढ्या हे काम करीत आहेत. पूर्वी मडक्यावर नैसर्गिक रंग वापरले जायचे; मात्र गेल्या काही वर्षांपासून त्याची जागा ऑईल पेंटने घेतली आहे. ग्राहकांकडून तशी मागणी असल्याने नाईलाजाने कृत्रिम रंग वापरून काम करावे लागते. मडक्यावरील कलाकुसरीच्या कामासाठी मेहंदी रंगविण्याचे कोन वापरले जातात. हे नाजूक काम स्त्रिया मोठ्या प्रमाणावर करतात.

५० वर्षांपासून मडक्‍यांवर कलाकुसर
मी लहान असल्यापासून जवळपास ५० वर्षांपासून आजोबा व आई-वडिलांसोबत मडक्यावर रंग देण्याचे व कलाकुसरीचे काम करीत आहे. आज आमची चौथी पिढी या कामात गुंतली आहे. रात्रंदिवस राबावे लागते. त्यामुळे चांगले उत्पन्न आम्हाला मिळते, अशी प्रतिक्रिया मडक्‍यावर रंगकाम व कलाकुसरीचे काम करणारे कारागीर गोविंदभाई चित्रोडा यांनी दिली.

आकारानुसार भाव
विना रंगवलेली साधी छोटी हंडी (मडके) ५० रुपयांपासून विकली जाते. ४०० रुपयापर्यंत कलाकुसर केलेली हंडी होलसेल भावात विक्री केली जात आहेत. मुंबईसह आसपासच्या नालासोपारा, मिरा-भाईंदर आदी ठिकाणांहून मडकी खरेदीसाठी विक्रेते येतात. तसेच गोपाळकाल्याच्या आदल्या दिवशी व दहीहंडीच्या दिवशी मंडळाचे लोक खरेदीसाठी येतात, अशी प्रतिक्रिया विक्रेते धनसुख पुरुषोत्तम गाला यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com