

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरला मेट्रोच्या जाळ्याने जोडण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका-५चा कल्याणपर्यंतचा विस्तार आणि पुढे उल्हासनगरपर्यंत जाणाऱ्या मेट्रो-५ए च्या मार्गाला आता केंद्र सरकारच्या अधिसूचनेमुळे अधिकृत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ठाणे आणि भिवंडीहून कल्याणमार्गे उल्हासनगरपर्यंत मेट्रोने प्रवास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाने शुक्रवारी (ता. २८) याबाबत अधिसूचना जारी केली आहे. सध्या कापूरबावडी ते धामणकर नाका या मेट्रो-५च्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू असून, सुमारे ९८ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती आहे. हा ११.९० किमीचा मार्ग डिसेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मेट्रो-५चा विस्तार धामणकर नाका ते दुर्गाडी असा होणार आहे.
या विस्ताराचा पुढील टप्पा प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाचा आहे. दुर्गाडी ते कल्याण हा मेट्रो-५एचा सुमारे ६.५५ किलोमीटरचा मार्ग असेल. त्यानंतर भोईवाडी ते उल्हासनगर असा ५.२७ किलोमीटरचा फाटा प्रस्तावित आहे. त्यामुळे ठाणे-कापूरबावडीपासून सुरू होणाऱ्या मेट्रो मार्गाला भिवंडी, कल्याण आणि पुढे उल्हासनगर अशी जोडणी मिळणार आहे.
मार्गातील स्थानके निश्चित
केंद्राच्या अधिसूचनेतील तक्त्यात मेट्रो-५च्या मार्गावर कापूरबावडी, बाळकुम, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा, धामणकर नाका, भिवंडी, टेमघर, राजनौली, गोवेगाव, कोनगाव पश्चिम आणि कोनगाव पूर्व अशी स्थानके नमूद आहेत.
तर मेट्रो-५ए आणि त्याच्या फाट्यावर दुर्गाडी, खडकपाडा, भोईवाडी, छत्रपती शिवाजी पथ, कल्याण, शांतीनगर, छत्रपती शिवाजी चौक आणि उल्हासनगर अशी स्थानके निश्चित करण्यात आली आहेत. कशेळी येथे मेट्रोचे डेपो प्रस्तावित आहे.
३४ किमीचा विस्तारित मार्ग
धामणकर नाका-दुर्गाडी, दुर्गाडी-कल्याण आणि भोईवाडी-उल्हासनगर या तीन टप्प्यांसह सुमारे ३४ किमीचा विस्तारित मेट्रो मार्ग उभारला जाणार असून, त्यावर १९ स्थानके असतील. या संपूर्ण विस्ताराचा खर्च सुमारे १८ हजार १३० कोटी असल्याची माहिती आहे.
भूमिगत, दुमजली मार्ग
धामणकर नाका ते टेमघरदरम्यान मेट्रोचा काही भाग भूमिगत असेल, तर राजनौली जंक्शन ते दुर्गाडी चौकदरम्यान दुमजली मार्गाची रचना करण्यात येणार आहे. यामुळे रस्ते वाहतूक आणि मेट्रोची स्वतंत्र व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सार्वजनिक प्रवासासाठी सक्षम पर्याय
मेट्रो-५ पुढे मेट्रो-४, प्रस्तावित मेट्रो-१२ आणि मध्य रेल्वेशी जोडली जाणार असल्याने ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर परिसरातील प्रवाशांना मुंबई महानगर प्रदेशातील विविध भागांत जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा अधिक सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये
१. ठाणे ते भिवंडी : मेट्रोचा थेट पर्याय
भिवंडी ते कल्याण : पुढील टप्प्यात मेट्रो जोडणी
२. कल्याण ते उल्हासनगर : मेट्रो-५एच्या फाट्यामुळे जोडणी
३. एकूण विस्तारित मार्ग : सुमारे ३४ किमी
४. स्थानके : १९
५. एकूण अंदाजित खर्च : १८,१३० कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.