

‘स्वराज्य’ प्रशासकीय मुख्यालयाची महापौरांकडून पाहणी
गुणवत्तापूर्ण, वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
पनवेल, ता. ३१ (बातमीदार) : पालिकेच्या बहुप्रतीक्षित ‘स्वराज्य’ या प्रशासकीय मुख्यालय इमारतीच्या बांधकामाला चांगलाच वेग आला असून, सुरू असलेल्या कामाची पाहणी महापौर नितीन पाटील यांनी नुकतीच (ता. २७) केली. पाहणीदरम्यान त्यांनी इमारतीच्या विविध भागांच्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. तसेच संबंधित अधिकारी, अभियंते आणि ठेकेदारांना आवश्यक त्या सूचना देत उर्वरित सर्व कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने व वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
महापालिकेच्या या प्रशासकीय इमारतीसाठी अंदाजे ११० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सुमारे पाच एकर क्षेत्रफळाच्या भूखंडावर ही इमारत उभारण्यात येत असून, बांधकामाचे क्षेत्रफळ सुमारे चार लाख आठ हजार ६३ चौ. फूट आहे. नूतन मुख्यालयामध्ये १८३ चारचाकी आणि एक हजार ११३ दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच २२४ आसनक्षमतेचे मुख्य सभागृह, एक बहुउद्देशीय हॉल, दोन समिती सभागृह, आठ लिफ्ट्स, आठ जिने आणि टेरेसवर आर्ट गॅलरीचा समावेश करण्यात आला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ग्रीड/व्हॉइडेड स्लॅब प्रणाली तसेच पर्यावरणपूरक संकल्पनेवर आधारित या इमारतीची रचना करण्यात आली आहे. इमारतीला प्लॅटिनम रेटिंग मिळविण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
नवीन मुख्यालयामुळे नागरिकांना अधिक सक्षम, सुसज्ज आणि आधुनिक प्रशासकीय सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. पुढील ५० वर्षांचा वेध घेऊन ही वास्तू उभारण्यात येत असल्याचे महापौर नितीन पाटील यांनी सांगितले. या वेळी सभागृह नेते ॲड. प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, नगरसेविका रुचिता लोंढे, शहर अभियंता, संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच ठेकेदार उपस्थित होते.
स्वराज्य प्रशासकीय मुख्यालय ही केवळ प्रशासकीय इमारत नसून, पनवेलच्या पुढील ५० वर्षांच्या विकासाचा पाया आहे. आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक संकल्पना आणि नागरिककेंद्री सुविधांचा समन्वय साधून ही वास्तू उभारली जात आहे. कामाचा दर्जा आणि वेळ यामध्ये कोणतीही तडजोड न करता प्रकल्प पूर्ण करण्यावर आमचा भर आहे.
- नितीन पाटील, महापौर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.