

स्वच्छतेत तिसरे; डेब्रिज व्यवस्थापनाची अधिकृत व्यवस्था कुठे?
सजग नागरिक मंचचा सवाल; आरटीआयच्या आधारे पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार
तुर्भे, ता. ३१ (बातमीदार) ः देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईने तिसरा क्रमांक मिळवला असला, तरी शहरात रोज निर्माण होणाऱ्या बांधकाम व पाडकाम कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी कोणती अधिकृत आणि एकात्मिक व्यवस्था अस्तित्वात आहे का, असा सवाल सजग नागरिक मंचने उपस्थित केला आहे. या गंभीर मुद्द्यावर मंचने थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली असून, राज्याच्या आपले सरकार पोर्टलवरही तक्रार नोंदवली आहे.
माहिती अधिकार कायद्यांतर्गत सिडको आणि नवी मुंबई महापालिकेकडे सी अँड डी वेस्ट व्यवस्थापनासंदर्भात विविध माहिती मागविण्यात आली होती. अधिकृत डेब्रिज व्यवस्थापन धोरण, संकलन व विल्हेवाट स्थळे, प्रक्रिया व पुनर्वापर केंद्रे तसेच वाहतूक व्यवस्थेबाबत काही बाबींवर माहिती उपलब्ध नाही, असे उत्तर मिळाल्याचा दावा मंचने केला आहे. त्यामुळे सिडकोच्या कार्यक्षेत्रात एकात्मिक अधिकृत डेब्रिज व्यवस्थापन व्यवस्था आहे का, याबाबत प्रश्न निर्माण झाल्याचे मंचचे म्हणणे आहे.
नवी मुंबईत पुनर्विकास, रस्ते, मेट्रो आणि विविध पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डेब्रिज निर्माण होत आहे. अनधिकृतपणे डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक असले, तरी नागरिक व कंत्राटदारांसाठी अधिकृतपणे डेब्रिज जमा करण्याची व्यवस्था उपलब्ध असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. डेब्रिज टाकू नका, असे सांगताना तो अधिकृतपणे कुठे जमा करायचा, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी मंचने केली आहे.
पर्यावरणालाही धोका
१ अधिकृत व्यवस्था अपुरी असल्यास डेब्रिज पाणथळ क्षेत्रे, खारफुटी, नैसर्गिक नाले, खाडी परिसर आणि मोकळ्या भूखंडांवर टाकला जाण्याचा धोका वाढतो. त्यामुळे जलनिचरा, जैवविविधता आणि पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो.
२ नवी मुंबई स्वच्छ शहर म्हणून तिसऱ्या क्रमांकावर असेल, तर विकासातून निर्माण होणाऱ्या डेब्रिजसाठीही वैज्ञानिक व आधुनिक व्यवस्था उभारणे आवश्यक आहे, असे सजग नागरिक मंचचे दत्ताराम सकपाळ यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.