

‘व्हर्स’कडून ‘स्पार्क स्टेशन’चे अनावरण
‘एआय’च्या मदतीने २४ तासांत चित्रफीत निर्मिती
सकाळ वृत्तसेवा
नवी दिल्ली, ता. ३१ : भारतातील स्थानिक भाषांतील तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी ‘व्हर्स इनोव्हेशन’ने ‘फिल्म एक्स्पो २०२६’मध्ये ‘स्पार्क स्टेशन’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित व्यासपीठ सादर केले. कल्पना, संहिता लेखन आणि कथाफलकापासून चित्रीकरण, संगीत, संवाद, संकलन, मथळे, अंतिम निर्मिती आणि वितरणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया एकाच प्रणालीत करण्याची सुविधा या व्यासपीठावर उपलब्ध आहे.
‘स्पार्क स्टेशन’मुळे ६० सेकंदांच्या जाहिरातपटाच्या निर्मितीचा खर्च १० ते २५ लाख रुपयांवरून ५० हजार ते ७५ हजार रुपयांपर्यंत कमी होऊ शकतो, असा कंपनीचा दावा आहे. तसेच काही आठवड्यांचा निर्मिती कालावधी सुमारे २४ तासांवर आणता येणार आहे. चेहरा, भावभावना, पोशाख, ठिकाण आणि साहित्य या पाच घटकांमध्ये संपूर्ण निर्मितीदरम्यान सातत्य राखण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ६० हून अधिक भाषांमध्ये भाषांतरासह ओठांची हालचाल, भावनिक वेळ आणि स्थानिक बोलीशी सुसंगत निर्मिती करता येणार आहे. चित्रपट निर्माते, निर्मिती संस्था, जाहिरात संस्था, ब्रँड, ई-वाणिज्य कंपन्या तसेच आशय निर्माते यांच्यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरणार आहे. ‘स्पार्क स्टेशन’चा सर्वसामान्य वापरासाठीचा टप्पा १ ऑक्टोबरपासून, तर उद्योगांसाठीचे एपीआय १ नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहे. पुढील दोन वर्षांत या तंत्रज्ञानासाठी तीन कोटी डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे.
लहान निर्मात्यांना मोठी संधी
चित्रपट, जाहिरातपट किंवा समाजमाध्यमांसाठीचा आशय तयार करताना निर्मिती खर्च हा अनेकदा मोठा अडथळा ठरतो. एआय तंत्रज्ञानामुळे कमी खर्चात प्रयोग करणे आणि अधिक पर्याय तयार करणे शक्य होणार आहे. मोठ्या निर्मिती संस्थांप्रमाणेच मर्यादित मनुष्यबळ आणि अर्थसंकल्प असलेल्या निर्मात्यांनाही दर्जेदार दृक्-आशय तयार करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे नव्या कल्पनांना व्यासपीठ मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.