

नऊवारीत ‘निर्भया’ गोविंदांची चार थरांची सलामी!
चुनाभट्टीतील महिला पथकाची दहीहंडीसाठी जोरदार तयारी
चेंबूर, ता. ३१ (बातमीदार) ः ढोल-ताशांचा गजर, गोविंदांच्या जयघोषाने दुमदुमणारे वातावरण, उंचावर बांधलेली दहीहंडी आणि ती फोडण्यासाठी जीवाची बाजी लावत रचले जाणारे मानवी मनोरे, हे दहीहंडी उत्सवाचे पारंपरिक चित्र. दरम्यान, काळानुसार या साहसी खेळात महिलांचाही सहभाग वाढत असून, पुरुषांच्या बरोबरीने महिला गोविंदाही उंच थरांची सलामी देताना दिसत आहेत. चुनाभट्टीतील ‘निर्भया महिला गोविंदा पथक’ यंदा चार थरांचा मानवी मनोरा रचण्याच्या तयारीत असून, या पथकाच्या धाडसी प्रात्यक्षिकामुळे परिसरात दहीहंडीची उत्सुकता वाढलेली पाहायला मिळत आहे.
सायन-चुनाभट्टी परिसरातील मुक्तादेवी गार्डन, वेरावली बिल्डिंगजवळील हिल रोड येथे सोमवारी निर्भया महिला गोविंदा पथकाने चार थरांच्या मानवी मनोऱ्याचे प्रात्यक्षिक सादर केले. नऊवारी साडी परिधान करून महिला गोविंदांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने थर रचले. एकमेकींच्या खांद्यावर विश्वास ठेवत थरावर थर चढताना त्यांचा आत्मविश्वास, शारीरिक संतुलन आणि समन्वय पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले.
निर्भया महिला गोविंदा पथकाचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे पारंपरिक नऊवारी साडीतील गोविंदा. आधुनिक काळात दहीहंडी उत्सवात विविध प्रकारच्या वेशभूषा आणि सादरीकरण पाहायला मिळत असले, तरी नऊवारी साडी परिधान करून मानवी मनोरा रचणाऱ्या महिला गोविंदांचे सादरीकरण वेगळे ठरते.
चुनाभट्टीत २००८ मध्ये महिला गोविंदा पथकाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. सुरुवातीला मोजक्या महिलांनी सुरू केलेला हा प्रवास आज सुमारे ५० महिला गोविंदांपर्यंत पोहोचला आहे. पथकाच्या तयारीमागे मुख्य प्रशिक्षक महेश नावले यांचे मार्गदर्शन आणि परिश्रम आहे. गोविंदांच्या शारीरिक क्षमतेनुसार त्यांची भूमिका निश्चित करणे, थरांची रचना करताना संतुलन राखणे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची काळजी घेणे यावर सरावादरम्यान विशेष लक्ष दिले जाते. पूजा मिसाळे, मानसी नावले आणि ईशा नावले यांच्या मेहनतीमुळे पथकाचा सराव शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे.
५० महिला गोविंदांचा सराव
यंदा चार थरांचा मानवी मनोरा रचण्याचे उद्दिष्ट पथकाने ठेवले आहे. या पथकात १० वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ४० वर्षांपर्यंतच्या महिलांचा समावेश आहे. सुमारे ५० महिला गोविंदा सध्या नियमित सराव करीत आहेत. विशेष म्हणजे डोंबिवली, घणसोली, विरार तसेच मुंबईच्या विविध भागांतून महिला दररोज चुनाभट्टीत सरावासाठी येतात. गेल्या महिनाभरापासून त्यांचा दररोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत सराव सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.