खड्ड्यांचे विघ्न कायम

खड्ड्यांचे विघ्न कायम
Published on

वसई, ता. ३१ (बातमीदार) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वसईनगरीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, लाडक्या गणेशाच्या आगमनाची गणेशभक्तांना आतुरता लागली आहे. आरास, मखर, सजावट आणि घराच्या रंगरंगोटीच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठांकडे वळू लागले आहेत; मात्र शहरातील खड्डेमय रस्ते आणि वाहून गेलेल्या खडीमुळे नागरिकांच्या आनंदावर ‘खड्ड्यांचे विघ्न’ आले आहे.

वसई-विरार शहरातील विविध भागांतील रस्त्यांची पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी खडी वाहून गेल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वसई पूर्वेतील एव्हरशाईन, सोपारा, वसंतनगरी, माणिकपूर, अंबाडी, गास, निर्मळ, भुईगाव, धानीव बाग, पेल्हार, चंदनसार यांसह अनेक भागांतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.

रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात विविध राजकीय पक्ष तसेच नागरिकांकडून आंदोलन, निवेदने आणि पत्रव्यवहार सुरू आहेत. महापालिका प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे; मात्र उत्सवाच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना सध्या खड्ड्यांतूनच मार्ग काढावा लागत आहे.

दरम्यान, येत्या दहीहंडी उत्सवात गोविंदांनाही याच रस्त्यांवरून प्रवास करावा लागणार असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गणेशोत्सव आणि दहीहंडीपूर्वी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांचा प्रवास सुखकर करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

गणेशमूर्तींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका निघतात. महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच हजारो गणेशभक्त सहभागी होत असतात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी, यासाठी आयुक्तांना निवेदन दिले आहे.
- अभिजित सांगळे, वसई तालुका विधानसभा समन्वयक, ठाकरे गट

गाेविंदांचीही हाेणार दमछाक
वसई-विरार शहरात दहीहंडीची धूम पाहावयास मिळणार असून, यासाठी गोविंदा पथक, सार्वजनिक मंडळ, पक्षीय मंडळे सज्ज झाली आहेत. गोविंदा हे गल्लोगल्ली हंडी फोडण्यासाठी जाताना दुचाकी, रिक्षा, टेम्पोचा वापर करीत असतात; मात्र गोविंदांचीदेखील खड्ड्यांतून मार्ग काढताना दमछाक होणार आहे.

वसई : शहरातील रस्त्यांवर खड्डे पडून अनेक ठिकाणी खडी वाहून गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com