सणासुदीच्या दिवसांत एसटी प्रवाशांची फरफट

सणासुदीच्या दिवसांत एसटी प्रवाशांची फरफट
Published on

सणासुदीच्या दिवसांत एसटी प्रवाशांची फरपट
सायन-पनवेल महामार्गावरील थांब्यांवर दुरवस्था

जुईनगर, ता. ३१ (बातमीदार) : श्रावण महिन्यापासून सुरू झालेल्या सण-उत्सवांमुळे मुंबईतून कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील मूळ गावी जाणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे; मात्र अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सायन-पनवेल महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एसटी प्रवाशांची भीषण फरपट होत आहे. वाढत्या गर्दीच्या तुलनेत महामार्गावरील एसटी बसथांब्यांची झालेली दुरवस्था, अपुरी बैठक व्यवस्था आणि बेकायदा खासगी वाहनांच्या अडथळ्यांमुळे प्रवाशांना तीव्र मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एसटी बसथांब्यापासून २०० मीटर अंतरापर्यंत खासगी वाहने उभी करण्यास मनाई असणारा सूचनाफलक परिवहन विभागाने लावला आहे; परंतु तुर्भे वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या नियमाचा पुरता फज्जा उडाला आहे. एलपी आणि तुर्भे परिसरातील थांब्यांवर खासगी वाहने, ट्रॅव्हल्स आणि टॅक्सी बेशिस्तपणे उभ्या राहतात. त्यामुळे एसटी गाड्यांना मुख्य थांब्यावर जागा न मिळता त्या रस्त्याच्या मधोमध उभ्या कराव्या लागतात. बस नेमकी कुठे थांबली आहे, याचा अंदाज न आल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह सामानाची आवराआवर करीत गाडीच्या मागे धावावे लागते. या गोंधळात अनेक प्रवाशांच्या गाड्या हुकत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच, अपघाताचाही धोका संभवतो.

माहितीचा अभाव अन् ताटकळणारे प्रवासी
पुणे, स्वारगेट आणि कोल्हापूर मार्गावर जाणाऱ्या वातानुकूलित (शिवनेरी/शिवाई) गाड्यांमध्ये तिकीट तपासण्यासाठी नियंत्रक चढल्यानंतर थांब्यावर नेमक्या कोणत्या गाड्या आल्या आणि गेल्या, याची कोणतीही उद्घोषणा केली जात नाही. थांब्यावर एसटी महामंडळाचे वाहतूक नियंत्रक उपस्थित असतानाही प्रवाशांना अपेक्षित मार्गदर्शन मिळत नाही. विनाआरक्षित प्रवाशांकडे चौकशी न करताच गाड्या पुढे निघून जात असल्याने प्रवाशांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. एसटीच्या दर्शनी भागावरील मार्गफलक (बोर्ड) अस्पष्ट असल्याने वृद्धांना गाडी ओळखणे कठीण जात आहे. अशा तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत.

प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
गणपती आणि पुढील सणांच्या काळात ही गर्दी आणखी वाढणार असल्याने परिवहन विभाग आणि तुर्भे वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. थांब्यांच्या २०० मीटर परिसरात अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या खासगी वाहनांवर कडक दंडात्मक कारवाई करावी. तुटलेले आसरे दुरुस्त करून प्रवाशांना पाऊस आणि उन्हापासून संरक्षणासाठी बैठक व्यवस्था उभारावी. थांब्यांवर स्पष्ट सूचनाफलक लावावेत आणि ध्वनिक्षेपकावरून गाड्यांच्या आगमनाची व प्रस्थानाची वेळेवर माहिती दिली जावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com