

एसआयआरच्या माध्यमातून
विरोधी नेतृत्व संपवण्याचा डाव
मुंब्रा-कळव्यातील दोन लाख मतदार वगळले ः आव्हाड
कळवा, ता. ३१ (बातमीदार) ः एसआयआरच्या माध्यमातून विरोधातील प्रबळ नेतृत्व संपविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. जे पश्चिम बंगालमध्ये, तमिळनाडूमध्ये घडविले ते आपल्याकडेही होत आहे. कळवा, मुंब्रा भागात सुमारे दोन लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते आ. डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी आज केला.
मुंब्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे समीर शमीम खान यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आव्हाड यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमाला पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधानदेखील उपस्थित होते.
डाॅ. आव्हाड म्हणाले, ममता बॅनर्जी यांचा पराभव होईल, अशी स्थिती कधीच नव्हती. त्यांचा पराभव जेवढ्या मतांनी झाला तेवढीच मते एसआयआरमध्ये कापण्यात आल्याचे उघडकीस आले, असे स्पष्टीकरणही देण्यात आले आहे. तमिळनाडूमध्ये स्टॅलिन कसे पराभूत होऊ शकतात? स्टॅलिन १,५०० मतांनी हरले. ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन हे दोघे माजी मुख्यमंत्री असतानाही त्यांना षड्यंत्र करून हरविण्यात आले. भाजप आणि मित्रपक्षांचे हे षड्यंत्र असून, समोरील उमेदवाराची एसआयआरच्या माध्यमातून मते कापून त्यांना पराभूत करण्याचे धोरण आखण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. या वेळी कळवा-मुंब्रा विधानसभाध्यक्ष शमीम खान, विरोधी पक्षनेते शानू पठाण, ऋता आव्हाड, अल्पसंख्याक सेलचे ठाणे अध्यक्ष मुफ्ती, नगरसेवक यासीन कुरेशी, सुधीर भगत, मर्जिया पठाण, दीपाली भगत, मनीषा भगत, भूषण गोटे, पल्लवी जगताप, शाकीर शेख, सीमा दाते आदी उपस्थित होते.
------------
मतदार नोंदणी करा
‘जेन झी’नी म्हणजेच १८ पासून ३० वयापर्यंतच्या तरुणांनी येत्या काही दिवसांत फॉम नंबर ६ भरण्याचे आवाहनही आव्हाड यांनी केले. आपल्याला कोणाचेही भय नसून मत नोंदणी करणे ही आपल्या पक्ष संघटनेची जवाबदारी आहे. संघटनेने याच जबाबदारीने तरुणांपर्यंत पोहोचून काम केले पाहिजे. निवडणुकीला अजून अडीच वर्षे बाकी आहेत; परंतु निवडणूक लवकरही लागू शकते. आपली तयारी आजपासून झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
---------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.