

‘एसआयआर’वरून ठाण्यात काँग्रेस आक्रमक
मतदार जागेवर तरी नावे यादीतून गायब
विक्रांत चव्हाण यांच्या पत्नीचेही नाव वगळले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : मतदार आपल्या पत्त्यावर वास्तव्यास असतानाही त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जात असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला. विशेष म्हणजे, चव्हाण यांच्या पत्नीचे व एसआयआर प्रक्रियेची जबाबदारी असलेल्या नायब तहसीलदार यांच्या आईचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच मतदार जागेवर आहेत, त्यांचा पत्ता कायम आहे; मात्र मतदार यादीतून त्यांची नावे गायब केली जात असल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांनी आज केला.
ठाण्यातील एसआयआर मोहिमेतील भोंगळ कारभार उघडकीस आणताना, ही मोहीम पारदर्शकपणे न राबवता अनेक ठिकाणी बीएलओंनी प्रत्यक्ष घरोघरी न जाता घरबसल्या सर्वेक्षण केल्याचा दावा चव्हाण यांनी केला. ओवळा-माजिवडा मतदारसंघात सुमारे साडेतीन लाख, तर कळवा-मुंब्रा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नावे वगळण्यात आली आहेत. ठाण्याचे निवासी नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांच्या ८० वर्षीय मातोश्री वत्सला बाबूलाल पैठणकर यांनी अर्ज भरूनही त्यांचे नाव प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विक्रांत चव्हाण यांच्या पत्नी अरुणा विक्रांत चव्हाण यांचेही अनेक दशकांपासून मतदार यादीत असलेले नाव एसआयआर प्रक्रियेनंतर वगळल्याचे त्यांनी उघड केले.
एसआयआर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करीत चव्हाण यांनी निवडणूक विभाग व जिल्हा प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली आहे.
ठाण्यात राबविण्यात आलेल्या एसआयआर प्रक्रियेच्या नावाखाली मतदार यादीतील नावे वगळताना प्रत्यक्ष पडताळणी कितपत झाली, संबंधित मतदारांना त्यांची नावे वगळण्यात आल्याची माहिती देण्यात आली का, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. ही केवळ प्रशासकीय चूक नसून नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराशी संबंधित गंभीर बाब आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
..........................
आमरण उपोषणाचा इशारा
एसआयआर प्रक्रियेच्या चौकशीची मागणी जिल्हाधिकारी तसेच मुख्य निवडणूक आयोगाकडे करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या प्रकरणाची योग्य दखल घेतली नाही, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच ठाण्यातील एसआयआर प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करून वगळण्यात आलेल्या प्रत्येक नावाची फेरपडताळणी करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली.
---------------------
शिक्षकांना एसआयआरचे काम
एसआयआर प्रक्रियेसाठी शिक्षकांच्या नियुक्तीच्या निर्णयावरही चव्हाण यांनी टीका केली. शिक्षकांचे मूळ काम विद्यार्थ्यांना शिकविणे आहे; मात्र त्यांना विद्यार्थ्यांना शिकविण्याऐवजी मतदार याद्यांच्या पुनरावलोकनाच्या कामास जुंपण्यात आले आहे, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.