

अपघातात पादचारी, दुचाकीस्वारांचे सर्वाधिक मृत्यू
धोका रोखण्यासाठी २५० कोटींची नवी ट्राफिक यंत्रणा
परिवहनमंत्री सरनाईक यांची माहिती
ठाणे, ता. ३१ : अपघाती मृत्यूंचा वाढता धोका रोखण्यासाठी महाराष्ट्रात अत्याधुनिक ट्राफिक यंत्रणा उभारण्यात येणार असून, त्यासाठी राज्य सरकारने २५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही यंत्रणा २०२६-२७ मध्ये कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी (ता. ३१) ठाण्यात दिली.
महाराष्ट्रात रस्ते अपघातांचे सत्र कायम असून, २०२३ मध्ये तब्बल १५ हजार ४३४ जणांना अपघातात जीव गमवावा लागला. यामध्ये सात हजार ७८२ दुचाकीस्वार आणि एक हजार ८७५ पादचाऱ्यांचा समावेश आहे. एकूण अपघाती मृत्यूंमध्ये हे प्रमाण ७० टक्के आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालय आणि ठाणे शहर वाहतूक शाखेतर्फे ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’अंतर्गत ‘ट्राफिक स्कूल ऑन व्हील्स’ या उपक्रमाचा प्रारंभ गडकरी रंगायतन येथे सरनाईक यांच्या हस्ते झाला. २०२३ मध्ये देशात ३५ हजार २०३ पादचारी आणि ७७ हजार ५३९ दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाला. अपघाती मृत्यूंपैकी सुमारे ७० टक्के मृत्यू पादचारी आणि दुचाकीस्वारांचे असल्याने रस्ता सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती गरजेची असल्याचे सरनाईक यांनी या वेळी सांगितले.
‘ट्राफिक स्कूल ऑन व्हील्स’सारखे रस्ता सुरक्षा जनजागृतीचे उपक्रम जागोजागी राबविण्याची गरज असून, जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून अशी व्हॅन प्रत्येक जिल्ह्याला देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उद्घाटनप्रसंगी ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, कल्याण-डोंबिवलीच्या महापौर हर्षाली चौधरी, आमदार संजय केळकर, आमदार रवींद्र फाटक, पोलिस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलिस आयुक्त अशोक दुधे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी काटकर, वाहतूक उपआयुक्त पंकज शिरसाट यांच्यासह पोलिस व वाहतूक विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
प्रत्येक परिवहन कार्यालयाजवळ वाहतूक उद्यान
लवकरच महाराष्ट्रात सुमारे २५० कोटींची नवी ट्राफिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील प्रत्येक परिवहन कार्यालयाजवळ ‘धर्मवीर आनंद दिघे वाहतूक उद्यान’ उभारण्यात येणार आहे. भविष्यात रस्ता सुरक्षेसाठी आणखी अनेक महत्त्वाच्या उपाययोजना सरकार करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
४० लघुचित्रफितींमधून रस्ता सुरक्षेचे धडे
‘ट्राफिक स्कूल ऑन व्हील्स’ व्हॅनमध्ये स्क्रीन असून, रस्ता सुरक्षेबाबतच्या प्रात्यक्षिकांसह ४० लघुचित्रफिती दाखविण्याची सुविधा आहे. दररोज दोन शाळांना भेट देणाऱ्या या व्हॅनमध्ये एक अधिकारी आणि चार कर्मचारी तैनात असतील. या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक मेयर फार्माचे राजेश तावडे यांनी ही माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.