

अंबरनाथ, ता. १ (वार्ताहर) : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रिया (एसआयआर) पूर्ण झाल्यानंतर सोमवारी (ता. ३१) प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रक्रियेत एक लाख ६९ हजार ६७६ मतदारांची नावे प्रारूप यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे मतदारसंख्या तीन लाख ८४ हजार २६ वरून दोन लाख १४ हजार ४१२ इतकी झाली आहे. अनुपस्थित, स्थलांतरित तसेच मृत मतदारांची पडताळणी होऊ न शकल्याने ही नावे वगळण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी अर्चना खेतमाळीस गोरे यांनी दिली.
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात एकूण ३३९ मतदार यादी भाग असून, २९ जून ते १७ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करण्यात आली. या प्रक्रियेत दोन लाख १४ हजार ४१२ मतदारांचे (५५.८२ टक्के) डिजिटायझेशन पूर्ण झाले. तर एक लाख ६९ हजार ६७६ मतदारांचे (४४.१८ टक्के) डिजिटायझेशन होऊ शकले नाही. यामध्ये अनुपस्थित, स्थलांतरित आणि मृत मतदारांचा समावेश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना आपल्या नावाची तपासणी करता येणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येतील. त्यावर २९ ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेतला जाणार असून, ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
दावे-हरकती दाखल करता येणार
प्रारूप यादीत नाव आढळत नसलेल्या मतदारांनी घाबरून न जाता संबंधित मतदान केंद्रावरील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याशी (बीएलओ) संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह दावा दाखल करावा, असे आवाहन खेतमाळीस गोरे यांनी केले आहे. त्यामुळे प्रारूप यादीतून वगळण्यात आलेल्या एक लाख ६९ हजार ६७६ मतदारांच्या नावांबाबत आता दावे-हरकतींच्या प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.
नोट:- सोबत फोटो जोडलेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.