स्मार्ट मीटरवर चोरट्यांचा डल्ला

स्मार्ट मीटरवर चोरट्यांचा डल्ला
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : पाण्याचा प्रत्येक थेंब मोजून त्याचा वापर आणि देयकाचा अचूक हिशेब ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेने शहरात स्मार्ट मीटरची यंत्रणा उभी केली. आता याच स्मार्ट यंत्रणेचा हिशेब चोरट्यांनी बिघडविला आहे. २०१९ पासून शहरात स्मार्ट मीटर बसविण्यास सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत तब्बल पाच हजार मीटर चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीच्या परिसरात या घटना अधिक होत असल्याने स्मार्ट मीटर चोरीला आळा बसविण्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

ठाणे शहरातील पाणीपुरवठ्याचे प्रमाण समजावे, अनधिकृत पाणी वापरावर नियंत्रण ठेवता यावे आणि पाणी गळती शोधणे सुलभ व्हावे, यासाठी महापालिकेने स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय घेतला. शहरात सुमारे एक लाख १३ हजार ३२८ नळजोडण्या आहेत. त्यापैकी पालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांमध्ये टप्प्याटप्प्याने एक लाख सहा हजारांहून अधिक जोडण्यांवर मीटर बसविण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात यंत्रणा उभारल्यानंतरही हजारो मीटर चोरीला गेल्याने योजनेच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुंब्रा, दिवा, मोघरपाडा, वाघबीळ यांसह काही झोपडपट्टी भागांमध्ये मीटर चोरीचे प्रमाण अधिक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मीटर चोरीला गेल्यानंतर ग्राहकाला पुन्हा मीटर बसविण्यासाठी प्रक्रिया करावी लागते. परिणामी नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होतो. त्याचबरोबर महापालिकेच्या यंत्रणेवरही पुनर्जोडणीचा अतिरिक्त भार पडतो.

दरम्यान, पालिका हद्दीतील उर्वरित नळजोडण्यांवरही स्मार्ट मीटर बसविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे सध्याच्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्यास भविष्यात चोरीचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. मीटर चोरीला गेल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पोलिसांत तक्रार करून महापालिकेलाही माहिती द्यावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

पितळसाठी मीटरवर डल्ला
स्मार्ट मीटरमध्ये असलेल्या पितळेच्या भागामुळे त्याची भंगार बाजारात विक्री करता येते. एका मीटरमधील पितळ विकून साधारण चारशे ते पाचशे रुपये मिळत असल्याने चोरट्यांकडून मीटर लक्ष्य केले जात असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मीटरला जोडलेला पीव्हीसी पाईप कापून तो काही क्षणांत काढून नेता येत असल्याने चोरीची पद्धतही सोपी असल्याचे निदर्शनास आले आहे.

एका मीटरसाठी सहा हजार ६०० रुपये
स्मार्ट मीटर बसविण्याचे काम खासगी संस्थेमार्फत करण्यात आले आहे. एका मीटर बसवण्यासाठी साधारण सहा हजार ६०० रुपये खर्च येतो. मीटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास दुरुस्तीची जबाबदारीही संबंधित संस्थेची आहे. मात्र चोरीच्या घटना वाढल्याने केवळ मीटरची पुनर्जोडणीच नव्हे, तर संपूर्ण यंत्रणेच्या देखभाल आणि व्यवस्थापनावरही अतिरिक्त ताण येत आहे.

वाढीव बिलांमुळेही नागरिकांच्या तक्रारी
स्मार्ट मीटरमुळे पाण्याच्या वापराची अचूक नोंद होते, असा महापालिकेचा दावा आहे. मात्र मीटर बसवल्यानंतर अपेक्षेपेक्षा अधिक पाणी देयक येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे मीटरची अचूकता आणि बिल आकारणीची पद्धत याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. एकीकडे मीटर चोरीचे आव्हान आणि दुसरीकडे वाढीव बिलांच्या तक्रारी, अशा दुहेरी कोंडीत स्मार्ट मीटर योजना सापडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com