एनसीएमसीची सक्ती, ढिसाळ नियोजनाचा फटका

एनसीएमसीची सक्ती, ढिसाळ नियोजनाचा फटका
Published on

एनसीएमसीची सक्ती, ढिसाळ नियोजनाचा फटका
श्रीवर्धन तालुक्यात महिला, ज्येष्ठांना सवलतीऐवजी पूर्ण भाडे; सर्व्हर डाऊनमुळे नोंदणीसाठी तासन्तास प्रतीक्षा
श्रीवर्धन, ता. १ (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी १ सप्टेंबरपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान, या निर्णयाची पुरेशी जनजागृती न केल्याने तसेच नोंदणी आणि कार्ड वितरणाचे योग्य नियोजन नसल्याने पहिल्याच दिवशी प्रवासी आणि वाहकांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण झाले. श्रीवर्धन आगारात तर एनसीएमसी कार्ड नसलेल्या महिलांकडून सवलतीऐवजी थेट पूर्ण प्रवासभाडे आकारण्यात आले.
कार्ड नोंदणीसाठी शासनाने कमी मुदत दिल्याने बस स्थानकांसह विविध केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे. त्यातच नोंदणी केंद्रांवरील सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने एका कार्डासाठी प्रवाशांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. ग्रामीण भागातील डिजिटल साक्षरतेचा अभाव असलेल्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन कार्ड प्रणालीची पुरेशी माहिती नसल्याने त्यांचा मनस्ताप वाढला आहे. कार्ड वितरण यंत्रणा अद्याप सुरळीत नसतानाच करण्यात आलेली सक्ती प्रवाशांसाठी अडचणीची ठरत आहे.

पूर्ण भाडे आकारणीचा नियम
श्रीवर्धन आगारात एनसीएमसी कार्ड नसलेल्या महिलांकडून पूर्ण भाडे आकारण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत आगारप्रमुखांनी स्पष्ट केले, की प्रवाशांकडे एनसीएमसी कार्ड नसल्यास किंवा कार्डमध्ये आवश्यक शिल्लक नसल्यास नियमानुसार पूर्ण तिकीट आकारले जात आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी आणि सर्व्हरची समस्या दूर होईपर्यंत सवलतीसाठी एनसीएमसी कार्डची अट शिथिल करावी तसेच नोंदणी प्रक्रिया सुलभ करून तांत्रिक यंत्रणा तातडीने सुरळीत करावी, अशी मागणी श्रीवर्धन तालुक्यातील संतप्त प्रवाशांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com