

मद्यधुंद ट्रेलरचालकाने दुचाकीस्वाराला फरपटत नेले
उरण-खोपटा पुलावरील धक्कादायक घटना; जेएनपीए परिसरातील नशेखोरीवर कारवाईची मागणी
उरण, ता. १ (बातमीदार) ः उरण-खोपटा पुलावर मद्यधुंद अवस्थेत बेदरकार ट्रेलर चालवणाऱ्या एका चालकाने दुचाकीस्वाराला धडक देत चालकाला फरपटत नेल्याची घटना घडली आहे. दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखल्याने तो या अपघातातून थोडक्यात बचावला; मात्र या घटनेमुळे उरण-खोपटा मार्गावरील अवजड वाहनांची अनियंत्रित वाहतूक आणि लहान वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.
जेएनपीए बंदर परिसरातून मोठ्या प्रमाणात ट्रेलर कंटेनर आणि इतर अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. या मार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ असताना काही वाहनचालकांकडून वेगाने तसेच निष्काळजीने वाहने चालवली जात असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी मद्यपान करून अथवा अमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालविणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेषतः बंदर परिसरातील अवजड वाहनचालकांची नियमितपणे तपासणी करावी, तसेच वाहन चालविण्यापूर्वी चालक नशेत तर नाही ना, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.
जेएनपीए परिसरात नशेच्या पदार्थांच्या विक्रीचा आरोप
जेएनपीए परिसरातील काही ठिकाणी दारू तसेच गांजा आणि इतर अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. बंदर परिसरात राज्याच्या विविध भागांतून तसेच परराज्यांतून मोठ्या संख्येने चालक येत असतात. त्यामुळे नशेच्या पदार्थांची अवैध विक्री होत असल्यास त्याचा परिणाम केवळ कायदा-सुव्यवस्थेवरच नव्हे तर रस्ते सुरक्षेवरही होऊ शकतो. त्यामुळे अशा ठिकाणी नियमित तपासणी व गस्त वाढविण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.