चार दिवसांनंतरही प्रशासन निद्रिस्त

चार दिवसांनंतरही प्रशासन निद्रिस्त
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील रुग्णाच्या ताटात झुरळ आढळल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला. संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषी अन्नपुरवठादार ठेकेदारावर कारवाई करावी, या मागणीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज (ता. १) रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक सहामध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या महिला रुग्णाला २८ ऑगस्टच्या रात्री जेवण देण्यात आले होते. जेवण करताना त्यामध्ये झुरळ आढळून आल्याने रुग्णालयातील अन्नपुरवठ्याच्या स्वच्छतेचा आणि गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला. या प्रकाराची माहिती मिळूनही रुग्णालय प्रशासनाने संबंधित रुग्णाची भेट घेतली नाही किंवा घटनेची तातडीने चौकशी केली नाही, असा दावा मनसेने केला. या पार्श्वभूमीवर मनसेचे जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी रुग्णालयात दाखल झाले. प्रशासनाकडून समाधानकारक कारवाई होत नसल्याचा दावा करीत त्यांनी अधिष्ठाता डॉ. कदम यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले.

आंदोलकांची मागणी
संबंधित अन्नपुरवठादाराची चौकशी करून दोषी आढळल्यास त्याला काळ्या यादीत टाकावे, तसेच या प्रकरणात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान, आंदोलन सुरू झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने प्रकरणाची दखल घेतली.

अधिष्ठात्यांकडून रुग्णाची भेट
अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांनी संबंधित रुग्णाची भेट घेतली. तसेच डॉ. माळगावकर यांनी रुग्णाकडून घटनेची माहिती जाणून घेतली. या प्रकरणाची चौकशी करून पुढील दोन दिवसांत अहवाल देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

यापूर्वीही तक्रारी
रुग्णालयातील जेवणाच्या गुणवत्तेबाबत यापूर्वीही तक्रारी झाल्याचा दावा मनसेने केला आहे. रुग्णांना उपचारासाठी दाखल केले जाते; अशा परिस्थितीत त्यांना देण्यात येणारे अन्न स्वच्छ आणि सुरक्षित असणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ संबंधित रुग्णाची माहिती घेऊन प्रकरण थांबवू नये, तर अन्नपुरवठ्याची संपूर्ण प्रक्रिया तपासावी, अशी मागणी मनसेने केली आहे.

अन्नाचा नमुना ‘एफडीए’कडे नाही
रुग्णाच्या जेवणात झुरळ आढळल्याच्या घटनेला चार दिवस उलटले असतानाही संबंधित अन्नाचा नमुना अद्याप अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) तपासणीसाठी पाठविण्यात आलेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अन्नाची गुणवत्ता तपासण्यास विलंब का झाला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचे आश्वासन रुग्णालय प्रशासनाने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com