नवी मुंबईकरांना मिळणार अत्याधुनिक आरोग्य सेवा

नवी मुंबईकरांना मिळणार अत्याधुनिक आरोग्य सेवा
Published on

नवी मुंबईकरांना मिळणार अत्याधुनिक आरोग्यसेवा
एकात्मिक आरोग्य सुविधा व व्यवस्थापन धोरण मंजूर
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १ : नवी मुंबई पालिकेच्या सर्वसाधारण महासभेत शहराच्या आरोग्य व्यवस्थेला नवसंजीवनी देणारा आणि नवी मुंबईकरांच्या आरोग्याचे रक्षण करणारे ‘एकात्मिक सार्वजनिक आरोग्य सुविधा व व्यवस्थापन धोरण २०२६’ सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडलेल्या या प्रस्तावावर विविध पक्षांच्या ३० हून अधिक नगरसेवकांनी सविस्तर चर्चा करून महत्त्वाच्या सूचना मांडल्या. महापौर सुजाता पाटील यांनी या धोरणाला मंजुरी देत याच्या अंमलबजावणीचा मासिक अहवाल दरमहासभेत सादर करण्याचे कडक निर्देश पालिका प्रशासनाला दिले.
खाडीकिनारा व दाट लोकवस्तीच्या भागात सर्पदंशाचे प्रमाण जास्त असल्याने सेक्टर १४ व १६ च्या नागरी आरोग्य केंद्रांत सर्पदंशविरोधी लसींचा साठा असावा. कोपरखैरणे, घणसोली परिसरात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या काविळीवर उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि एक नवीन सुपरस्पेशालिटी व माता-बाल रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी नगरसेविका भारती पाटील यांनी केली. मेंदूच्या विकारांवरील उपचारासाठी महापालिका रुग्णालयांत ईईजी चाचणीची सोय असावी. रुग्णालयातील गर्दी आणि अस्वच्छता रोखण्यासाठी प्रत्येक मजल्यावर नातेवाइकांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा कक्ष तयार करावा. मानसिक तणावावर उपचारासाठी सायकॉलॉजिस्ट/समुपदेशक नियुक्त करावेत, अशी मागणी नगरसेविकांनी केली. भेसळयुक्त अन्न आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आजार वाढत असल्याने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात व माता-बाल रुग्णालयात आहारतज्ज्ञ नियुक्त करून नागरिकांना डायट चार्ट उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका कविता सांगळे यांनी केली. ऐरोलीतील जिजाऊ रुग्णालयात १२ वर्षांवरील रुग्णांवर उपचार व आपत्कालीन हृदयविकाराचे उपचार त्वरित सुरू करावेत. मनुष्यबळासाठी खासगी संस्थांशी पारदर्शक कोलॅबोरेट/पीपीपी तत्त्वावर सहकार्य घ्यावे, अशी मागणी नगरसेविका वैशाली नाईक यांनी केली. ज्येष्ठ नागरिकांना रांगेत ताटकळत राहावे लागू नये म्हणून नागरी आरोग्य केंद्रांत आणि रुग्णालयांत त्यांच्यासाठी विशेष ओपीडी कक्ष सुरू करावेत, अशी मागणी नगरसेविका सलुजा सुतार यांनी केली. महापालिकेच्या ॲपवर रिअल-टाइम बेड अव्हेलेबिलिटी ट्रॅकर असावा. ऐरोली रुग्णालयात सीटी स्कॅन, एमआरआय, २४ तास फार्मसी, शवगृह आणि प्रलंबित असलेली ब्लड बँक तातडीने कार्यान्वित करावी. वाशी व नेरूळ रुग्णालयांवर येणारा ताण पाहता नवी मुंबईतील करदात्या स्थानिक नागरिकांना खाटा आणि उपचारांमध्ये नियमावली करून प्रथम प्राधान्य देण्यात यावे. ओपीडीची वेळ सकाळी ११ ते दुपारी २ ऐवजी संध्याकाळपर्यंत वाढवण्यात यावी. गरीब व गरजू रुग्णांना उपचार मोफत मिळवून देणाऱ्या फोर्टिस योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची प्रशंसा करीत ही सेवा अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची मागणी केली. अशा अनेक मागण्या नगरसेविका व नगरसेवकांनी मांडल्या.

असे आहे धोरण...
१. सागर नाईक यांनी धोरणाची पार्श्वभूमी मांडताना स्पष्ट केले, की लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली दिघा ते बेलापूर अशा संपूर्ण नवी मुंबईत ५-स्तरीय आरोग्य व्यवस्था निर्माण करण्याचे हे धोरण आहे. रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात एमआरआय किंवा सीटी स्कॅनकरिता नेण्यासाठी पालिकेची मोफत शटल बससेवा उपलब्ध केली जाईल, असे नाईक यांनी सांगितले.
२. फोर्टिस रुग्णालयातील १० टक्के खाटा आणि वार्षिक ८०० मोफत रुग्णांच्या कोट्याचा पूर्ण वापर व्हावा, यासाठी शस्त्रक्रियेनंतरची ‘पोस्ट-केअर ट्रीटमेंट’ महापालिकेच्या रुग्णालयांत करून खाटा त्वरित मोकळ्या करण्याची यंत्रणा राबवली जाईल.
३. ऐरोली, घणसोली, तुर्भे, शिरवणे, महापे आणि १४ गावांच्या परिसरात टप्प्याटप्प्याने नवीन रुग्णालये व सुपरस्पेशालिटी सुविधा उभारण्यात येतील. केंद्र सरकारच्या ‘आभा’ डिजिटल कार्डशी ही यंत्रणा जोडून प्रत्येक नागरिकाचा वैद्यकीय इतिहास डिजिटल स्वरूपात जतन केला जाईल, असे सागर नाईक यांनी सभागृहात स्पष्ट केले.

लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या एआय तंत्रज्ञान, डेटा सिक्युरिटी, सायकॅट्रिक समुपदेशन, आहारतज्ज्ञ आणि मोबाईल ट्रॅकिंग ॲप या सर्व सुधारणांचा समावेश करून हे धोरण चार टप्प्यांत अत्यंत पारदर्शकतेने राबवले जाईल.
- संजय शिंदे, उपायुक्त

हे धोरण फक्त कागदावर न राहता आजपासूनच टप्प्याटप्प्याने प्रत्यक्षात आणायचे आहे. प्रशासनाने दरमहिन्याला होणाऱ्या सर्वसाधारण महासभेत या धोरणाच्या प्रगतीचा इत्थंभूत अहवाल सादर करावा, जेणेकरून कामाचा आढावा सभागृहाला नियमितपणे मिळेल.
- सुजाता पाटील, महापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com