आरोग्य धोरणावरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी

आरोग्य धोरणावरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Published on

आरोग्य धोरणावरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
‘टाइमपास’ शब्दावरून सभागृहात गदारोळ
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १ : नवी मुंबई पालिकेच्या महासभेत एकात्मिक आरोग्य सुविधा व व्यवस्थापन धोरण सादर झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. गेल्या ३१ वर्षांपासून पालिकेच्या सत्तेवर असलेल्या भाजपला लक्ष्य करीत शिवसेनेचे गटनेते मनोज हळदणकर यांनी विचारलेल्या एका रोखठोक सवालामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. इतक्या वर्षांनंतरही आरोग्य धोरण आणावे लागत असेल, तर एवढी वर्षे सत्ताधाऱ्यांनी टाइमपास केला का, या हळदणकर यांच्या वक्तव्यानंतर भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये तीव्र खडाजंगी पाहायला मिळाली.
सभेचे कामकाज सुरू असताना आरोग्य धोरणावरील चर्चेदरम्यान मनोज हळदणकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला. हळदणकर म्हणाले, की नवी मुंबई शहरात गेली ३१ वर्षे तुमचेच सरकार आणि सत्ता आहे. एवढ्या दीर्घ कालावधीनंतरही सत्ताधाऱ्यांना शहराकरिता सुधारित आरोग्य धोरण आणण्याची वेळ येत असेल, तर मग एवढी वर्षे सत्ताधाऱ्यांनी काय केले? एवढी वर्षे फक्त टाइमपास केला का? हळदणकर यांच्या या रोखठोक सवालांमुळे सत्ताधारी बाकांवरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. हळदणकर यांच्या ‘टाइमपास’ या शब्दावर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेतला. भाजप नगरसेवक सूरज पाटील यांनी तत्काळ उभे राहून हळदणकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला. शिवसेनेच्या गटनेत्यांनी सभागृहाची दिशाभूल करणारे आणि अत्यंत चुकीचे वक्तव्य केले आहे. महापालिकेने आरोग्य क्षेत्रात उभे केलेले काम दुर्लक्षित करून असे बेजबाबदार विधान करणे अयोग्य आहे, असे सूरज पाटील यांनी नमूद केले. यावरून दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची सुरू झाली.

महापौरांची कडक मध्यस्थी
सभागृहातील गोंधळ वाढल्याने महापौर सुजाता पाटील यांनी मध्यस्थी करीत शिवसेनेच्या गटनेत्यांच्या वक्तव्यावर कडक शब्दांत आक्षेप नोंदवला. सुजाता पाटील म्हणाल्या, की आणलेला प्रस्ताव हा नवी मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला आणि सभागृहाच्या कामकाजाला टाइमपास म्हणणे हा सभागृहाचा अपमान आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या सदस्याला या विषयावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरत नाही.

विरोधकांची घोषणाबाजी
महापौरांच्या या भूमिकेमुळे विरोधी पक्षातील शिवसेनेचे नगरसेवक अधिकच आक्रमक झाले. महापौरांनी वक्तव्य मागे घेण्यास किंवा बोलण्यास मनाई केल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी जागेवर उभे राहून घोषणाबाजी केली. यामुळे महासभेचे कामकाज काही काळ ठप्प झाले. आरोग्य धोरणासारख्या महत्त्वाच्या विषयावरून पालिका महासभेत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याने नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com