

मोदींच्या फोटोच्या वादावरून
भाजपचा शिवसेनेला इशारा
मनसेसोबतची युती तोडा, अन्यथा विरोधात बसू
कल्याण, ता. १ (वार्ताहर) ः पुण्यात मनसे नेते अमित ठाकरे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटविल्याच्या वादाचे पडसाद आता कल्याण-डोंबिवली महापालिकेतील राजकारणात उमटू लागले आहेत. या घटनेवरून भाजपने शिवसेनेला मनसेसोबतची युती तोडण्याची मागणी केली असून, अन्यथा केडीएमसीमधील युतीचा फेरविचार करण्याचा इशाराही दिला आहे.
भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, उपमहापौर राहुल दामले तसेच भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची या घटनेचा निषेध करण्यासाठी बैठक झाली. बैठकीत मनसेच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर नंदू परब यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना खरमरीत पत्र लिहून केडीएमसीमधील मनसेसोबतची युती तातडीने तोडण्याची मागणी केली आहे. या पत्रात २०२६च्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना महायुती म्हणून एकत्र लढले, तर मनसे महायुतीच्या विरोधात होती; मात्र निवडणुकीनंतर शिवसेनेने मनसेला सत्तेत सहभागी करून घेतले. महायुती धर्म पाळण्याच्या भूमिकेतून भाजपने त्या वेळी या निर्णयाला विरोध केला नाही, असे नमूद करण्यात आले आहे; मात्र मनसेकडून भाजपच्या अनेक पदाधिकारी आणि नेत्यांवर सातत्याने खालच्या पातळीवर टीका केली जात असून, महायुतीमध्ये बिघाडी निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचा आरोप परब यांनी केला आहे.
भाजपचे गटनेते शशिकांत कांबळे यांनीही शिवसेनेला थेट इशारा दिला. शिवसेनेने महायुतीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. अशा परिस्थितीत त्यांचा फोटो काढण्याच्या घटनेनंतर मनसेसोबत राहायचे की नाही, याचा शिवसेनेने विचार करण्याची गरज आहे, अन्यथा आम्ही केडीएमसीमध्ये विरोधकांच्या बाकावर बसण्यासही तयार आहोत, असे कांबळे म्हणाले.
उपमहापौर राहुल दामले यांनीही भाजपची भूमिका स्पष्ट करताना, महायुती टिकवायची असेल तर मनसेला तातडीने युतीच्या बाहेर काढावे. आमच्या नेत्यांचा अपमान होत असेल तर आम्ही मनसेसोबत सत्तेत बसणार नाही. आम्ही युतीधर्माचे पालन करतो; आता शिवसेनेने निर्णय घ्यावा, असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.