शिवसेना-भाजपची युती तुटणार?

शिवसेना-भाजपची युती तुटणार?
Published on

कल्याण, ता. २ (वार्ताहर) : पुण्यातील एका महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र काढण्यास मनसे नेते अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्याला सांगितल्याच्या कथित प्रकाराचे पडसाद कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात उमटले आहेत. कल्याण-डोंबिवलीत भाजप-शिवसेनेची युती आहे. या घटनेला शिवसेनेने मनसेला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेला भाजपसोबत महायुती कायम ठेवायची असल्यास मनसेला तातडीने बाहेर काढा. अन्यथा, भाजप महायुतीतून बाहेर पडून विरोधी बाकावर बसेल, असा इशारा भाजपने दिला आहे.
पुण्यातील मनसे प्रकरणानंतर भाजपने महायुती तोडण्याचे जे रणशिंग फुंकले आहे. या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. शिंदे सेनेने मनसेसोबतची युती तत्काळ तोडावी. त्यांना सत्तेतून बाहेर काढावे, असे पत्र शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना दिल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी सांगितले.
मनसेने आमच्या सर्वोच्च नेते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान केला आहे. आम्ही महायुतीचे धर्म नेहमीच पाळत आलो आहोत. पण आमच्या नेत्याचा अवमान खपवून घेणार नाही. त्यामुळे मनसे जर महायुतीत असेल तर त्यांच्यासोबत बसू शकत नाही, असे भाजपचे उपमहापौर राहुल दामले यांनी सांगितले.
भाजप गटनेते शशिकांत कांबळे यांनी सांगितले की, महापालिकेची निवडणूक भाजप शिंदे सेनेने एकत्रित लढली. १००पेक्षा जास्त जागा महायुतीला मिळाल्या. भाजपला विश्वासात न घेता शिंदे सेनेने मनसेशी युती केली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर मनसेकडून नेहमीच टीका केली जाते. शिष्टाचारानुसार प्रत्येक ठिकाणी राष्ट्रपती, पंतप्रधान यांचा फोटो असतो. आता तर मनसेने कहरच केला की, चक्क पंतप्रधानांचा फोटो काढला. शिंदे सेनेने मनसेला सत्तेतून बाहेर काढावे, असा इशारा कांबळे यांनी शिंदे सेनेला दिला आहे. याप्रसंगी सभागृह नेते वरुण पाटील, नगरसेवक दीपेश म्हात्रे, मंदार हळबे, दया गायकवाड, नगरसेविका रेखा चौधरी, खुशबू चौधरी उपस्थित होते.

भाजपची नेमकी भूमिका अद्याप अस्पष्ट
यासंदर्भात शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, भाजप जिल्हाध्यक्षांचा फोन आला होता. मला पत्र द्यायचे असे त्यांनी सांगितले. भाजपची नेमकी भूमिका काय हे मला अद्याप कळू शकलेले नाही. त्यामुळे याविषयी आत्ता काही सांगणे योग्य होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com