

सप्ताह, हरिनाम कीर्तनामुळे पखवाज व्यवसायाला चालना
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद्यांना वाढती मागणी; महागाईचा फटका
पोलादपूर, ता. २ (बातमीदार) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बाजारपेठा गजबजू लागल्या असून, पारंपरिक वाद्यांची मागणीही वाढली आहे. महाडसह पोलादपूर परिसरात ढोलकी, पखवाज, मृदंग, नाल आदी वाद्यांच्या दुरुस्तीला वेग आला आहे; मात्र वाद्यनिर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे यंदा वाद्यांच्या किमतीतही वाढ झाली आहे.
कोकणातील गणेशोत्सवाची परंपरा वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. आरती, भजन, जाखडी तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये पारंपरिक वाद्यांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे गणेशोत्सवाबरोबरच सप्ताह, हरिनाम, कीर्तन आदी कार्यक्रमांमुळे वाद्य दुरुस्ती आणि विक्रीच्या व्यवसायाला चांगलीच चालना मिळत आहे.
कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम वाद्यांच्या दरावर झाला आहे. यापूर्वी सुमारे ३,५०० रुपयांना मिळणारा तबला आता चार हजार रुपयांहून अधिक झाला आहे. मृदंगाची किंमतही पूर्वीच्या ३,५०० रुपयांवरून आता सुमारे ४,५०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ठेका पडताच ताल धरायला लावणाऱ्या ढोलकीची किंमतही अडीच ते तीन हजार रुपयांच्या घरात गेली आहे.
पारंपरिक व्यवसायाला नवसंजीवनी
वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या पोलादपूर तालुक्यातील गावागावांत हरिपाठ, हरिनाम सप्ताह आणि कीर्तनाच्या कार्यक्रमांना विशेष महत्त्व आहे. यंदा विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे गावांमध्ये पुन्हा भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, टाळ-मृदंग आणि ढोलकीचा निनाद घुमणार असल्याने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील तरुण पिढीही पारंपरिक कीर्तन, भजन आणि वारकरी संस्कृतीची परंपरा जपताना दिसत असल्याने पारंपरिक वाद्यांच्या व्यवसायालाही नवसंजीवनी मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.