

‘रुस्लान’ नवी मुंबई विमानतळावर दाखल
लॉजिस्टिक्स क्षमतेची नवी झेप
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर जगातील सर्वात मोठ्या आणि बलाढ्य उत्पादनक्षम मालवाहू विमानांपैकी एक असलेल्या अँटोनोव्ह एन-१२४ ‘रुस्लान’ या महाकाय विमानाचे दिमाखात आगमन झाले. अबुधाबी येथून सुमारे ४६ टन अवजड माल घेऊन आलेल्या या विमानाच्या यशस्वी लँडिंगमुळे एनएमआयएच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची आणि गुंतागुंतीचे कार्गो ऑपरेशन्स हाताळण्याच्या क्षमतेची नवी ओळख निर्माण झाली आहे.
‘कोड एफ’ श्रेणीत मोडणारे हे रुंद आकाराचे मालवाहू विमान अवजड, आकाराने विशाल आणि विशेष स्वरूपाच्या मालाच्या सुरक्षित वाहतुकीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या विमानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा पुढील भाग पूर्णपणे वरच्या दिशेने उघडता येतो. या अनोख्या रचनेमुळे मोठ्या आकाराची यंत्रसामग्री, वाहने आणि अवजड वस्तू विमानात चढवणे अत्यंत सोपे व सुरक्षित होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ प्रवासी वाहतुकीतच नव्हे, तर जागतिक मालवाहतुकीतही महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. ४६ टन वजनाचा माल आणि एन-१२४ सारख्या विशाल विमानाची सुरक्षित हाताळणी करून एनएमआयएने आपल्या अत्याधुनिक कार्गो सुविधा, धावपट्टीची क्षमता आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची सज्जता सिद्ध केली आहे. जगातील महाकाय मालवाहू विमानांचे स्वागत करून एनएमआयएने भविष्यातील आंतरराष्ट्रीय व्यापार आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील आपल्या भक्कम स्थानाची पावती दिली आहे. या यशस्वी आगमनामुळे मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या औद्योगिक क्षेत्रांना अवजड तसेच विशेष मालाची आंतरराष्ट्रीय वाहतूक करण्यासाठी एक अत्यंत सक्षम आणि आधुनिक पर्याय उपलब्ध झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.