मुंबईत स्वाईन फ्लूची चिंता वाढली

मुंबईत स्वाईन फ्लूची चिंता वाढली
Published on

मुंबईत स्वाईन फ्ल्यूची चिंता वाढली
महिनाभरात रुग्णसंख्या १०५ वरून ४४१ वर; मलेरियाचे ४,४८५ रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबईत पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव कायम असतानाच स्वाईन फ्ल्यूने (एच१ एन१) चिंता वाढवली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला १०५ असलेली स्वाईन फ्ल्यूची रुग्णसंख्या महिनाअखेरीस ४४१ वर पोहोचली आहे. म्हणजेच अवघ्या एका महिन्यात ३३६ रुग्णांची प्रत्यक्ष वाढ झाली असून, रुग्णसंख्या तब्बल ४.२ पट वाढली आहे. ही वाढ तब्बल ३२० टक्के असल्याने मुंबईतील स्वाईन फ्ल्यूचा वाढता धोका अधोरेखित झाला आहे.
सुरुवातीला रुग्णांची नोंद असताना ऑगस्टमध्ये ४४१ रुग्ण आढळले. त्यामुळे महिनाभरात ३३६ रुग्णांची भर पडली. १०५ वरून ४४१ अशी झालेली वाढ म्हणजे रुग्णसंख्येत तब्बल ३२० टक्क्यांची वाढ आहे. पावसाळ्यात वातावरणातील बदल, संसर्गाचा वाढता धोका आणि गर्दीच्या ठिकाणी होणारी मोठी वर्दळ यामुळे स्वाईन फ्ल्यूचा प्रसार वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
यंदा जून ते ३१ ऑगस्टदरम्यान मुंबईत मलेरियाचे चार हजार ४८५ रुग्ण आढळले आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत ही संख्या तीन हजार ७३३ होती. डेंगीचे एक हजार ५६३, चिकुनगुनियाचे ४६ आणि लेप्टोस्पायरोसिसचे २५५ रुग्ण आढळले आहेत. गॅस्ट्रोचेही एक हजार ९५४ रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. कोविड-१९ चे १५१ रुग्ण आढळले आहेत.

या विभागांत मलेरियाचा धोका
के-पश्चिम, जी-दक्षिण, एफ-दक्षिण आणि एच-पश्चिम विभागांमध्ये मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णसंख्येत एफ उत्तर, एम पूर्व, टी, के पूर्व आणि जी उत्तर विभागांमध्ये वाढ दिसून येत आहे. तर गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत एल, एच पश्चिम, के पश्चिम, एन आणि एच पूर्व विभागांमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे.

पाणी साचू देऊ नका
पावसामुळे घरात, घराभोवती किंवा इमारतीच्या परिसरात पाणी साचणार नाही, याची नागरिकांनी दक्षता घ्यावी. लेप्टोस्पायरोसिसपासून बचावासाठी साचलेल्या पावसाच्या पाण्यातून चालणे टाळावे. मुसळधार पावसात उघड्या पायाने चालण्याऐवजी शक्य असल्यास गमबूट वापरावेत. साचलेल्या पाण्याचा संपर्क आल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधक उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गॅस्ट्रोपासून बचावासाठी रस्त्यावरील किंवा उघड्यावर ठेवलेले अन्न टाळावे, जेवणापूर्वी हात धुवावेत आणि पाणी उकळून प्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com