

पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करा
महापौर, आयुक्तांचे प्लॅस्टिक, थर्माकोल वापर टाळण्याचे आवाहन
नेरूळ, ता. ३ (बातमीदार) ः नवी मुंबईत यंदाचा श्रीगणेशोत्सव पर्यावरणपूरक, प्लॅस्टिकमुक्त, कचरामुक्त व प्रदूषणमुक्त पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून प्रत्येकाने इकोफ्रेंडली उत्सव साजरा करावा, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
गणेशमूर्तीसाठी पर्यावरणपूरक शाडू मातीचा वापर करण्यावर विशेष भर देण्यात आला असून, नागरिकांनी शाडू मातीच्या पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी. गणेशोत्सवातील सजावटीसाठी थर्माकोल व प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा. त्याऐवजी कागद, पुठ्ठा, कापड तसेच पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर करून आकर्षक सजावट करावी. नवी मुंबई पालिकेच्या सीबीडी बेलापूर येथील वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्रामार्फत कपड्यांपासून आकर्षक सजावट साहित्य तयार करण्यात आले आहे. हे पर्यावरणपूरक कापडी सजावट साहित्य नागरिकांना सहज उपलब्ध व्हावे, यासाठी मुख्यालयासह आठही विभाग कार्यालयांमध्ये विशेष स्टॉल उभारण्यात येणार आहेत. नागरिकांनी त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रमुख मार्गदर्शक सूचना
१. उत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी निवासी भागात सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत ५५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज नसावा, तर रात्री १० ते मध्यरात्रीपर्यंत ४५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज नसावा. त्यानंतर लाऊडस्पीकरच्या वापरास सक्त मनाई असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
२. जलप्रदूषण रोखण्यासाठी श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांनी कृत्रिम तलावांचा वापर करावा. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रसाद व महाप्रसाद तयार करताना अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही पालिकेने सांगितले आहे.
३. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी प्लॅस्टिक व थर्माकोलचा वापर पूर्णपणे टाळून कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा. फटाक्यांचा वापर टाळून पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त व प्लॅस्टिकमुक्त इकोफ्रेंडली श्रीगणेशोत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन सुजाता पाटील आणि कैलास शिंदे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.