अण्णा भाऊ साठे यांच्या कर्तृत्वाचा एक अंश जरी अंगिकारला तरी समाजाचा विकास होईल – महापौर सुजाता पाटील

अण्णा भाऊ साठे यांच्या कर्तृत्वाचा एक अंश जरी अंगिकारला तरी समाजाचा विकास होईल – महापौर सुजाता पाटील
Published on

अण्णा भाऊ साठे यांच्या कर्तृत्वाचा एक अंश जरी अंगिकारला तरी समाजाचा विकास होईल ः महापौर सुजाता पाटील
नवी मुंबईत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववानांचा सन्मान

वाशी, ता. ३ (बातमीदार) ः लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यामधून समाजातील वास्तव, संघर्ष आणि सर्वसामान्यांच्या जीवनाचे प्रभावी दर्शन घडते. त्यांच्या आभाळाएवढ्या कर्तृत्वाचा एक अंश जरी आपण आपल्या जीवनात अंगिकारला, तरी वैयक्तिक व सामाजिक पातळीवर मोठा विकास साधता येईल, असे प्रतिपादन महापौर सुजाता पाटील यांनी केले. तसेच शिक्षण हाच समाजाच्या उन्नतीचा मुख्य मार्ग असल्याने पालकांनी पाल्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
पालिका समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समितीच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृह येथे बुधवारी (ता. २) आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सवात त्या बोलत होत्या. या वेळी समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समितीच्या सभापती रंजना सोनवणे, उपसभापती सुरेखा नरबागे, नगरसेविका ॲड. श्वेता काळे आदी मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कर्तृत्व गाजविणाऱ्या मातंग समाजातील बंधू-भगिनींचा तसेच पदव्युत्तर, पदवी, बारावी आणि दहावीच्या परीक्षांमध्ये गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी अखिल भारतीय मातंग समाजाच्या अध्यक्षा कुसुम गोपले आणि सुभाष काळे यांनीही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात शाहीर सुनील साठे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अण्णा भाऊ साठे यांची कवने सादर केली. त्यांच्या प्रभावी सादरीकरणाला उपस्थित श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.

भाऊंसारखा साहित्यिक जगाच्या इतिहासात होणे नाही ः विश्वास पाटील
मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, माजी सनदी अधिकारी तथा ‘अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान’ या पुस्तकाचे लेखक आणि ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते. आपल्या अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या व्याख्यानातून विश्वास पाटील यांनी अण्णा भाऊ साठे यांचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखविला. त्यांच्या जीवनातील विविध संघर्ष, प्रसंग आणि घटनांचा संदर्भ देतानाच अण्णा भाऊंच्या कथा व कादंबऱ्यांतील आशय आणि कथानकेही त्यांनी अत्यंत रंजकतेने मांडली. अण्णा भाऊंच्या साहित्याच्या वातावरणात मी वाढलो. त्यामुळे अण्णा भाऊ माझ्या श्वासात, अंगात आणि रक्तात रुजलेले आहेत, अशा शब्दांत विश्वास पाटील यांनी अण्णा भाऊंप्रती असलेली आपली आत्मीयता व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com