

ठाणे, ता. ३ (बातमीदार) : ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष, उंचच उंच मानवी मनोरे आणि गोविंदा पथकांच्या थरारासोबतच यंदा ठाण्यात छोट्या दहीहंड्यांचीही संख्या वाढली आहे. मोठ्या दहीहंड्यांमध्ये लाखोंच्या बक्षिसांसाठी आणि उंच थरांसाठी चुरस रंगणार असली, तरी गल्लीबोळांपासून सोसायट्यांपर्यंत छोट्या दहीहंड्यांचा उत्साहही शिगेला पोहोचला आहे. टेंभीनाक्यापासून रेमंड संकुलापर्यंत मोठ्या आयोजकांची जय्यत तयारी सुरू असताना, शहराच्या विविध भागांत छोट्या हंड्यांची मागणी आणि आयोजन वाढले आहे. त्यामुळे यंदा ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष केवळ मोठ्या मंडळांपुरता मर्यादित न राहता सर्वत्र अनुभवायला मिळणार आहे.
ठाण्याची मानाची हंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेंभीनाक्याच्या दहीहंडी उत्सवात यंदा ठाणे आणि मुंबईतील गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र हंडी ठेवण्यात आली आहे. दोन्ही शहरांतील पथकांना प्रत्येकी एक लाख ५१ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. महिला गोविंदांसाठी एक लाख रुपयांचे विशेष पारितोषिक दिले जाणार आहेत. मनोरंजनासाठी नामवंत गायक, कलाकार, लावणी आणि लोकनृत्यांचे कार्यक्रमही होणार आहेत.
संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीला यंदा ११ लाखांचे मोठे बक्षीस आकर्षण ठरणार आहे. मागील वर्षी कोकणनगर गोविंदा पथकाने दहा थर रचून विश्वविक्रम केला होता. साई जलाराम प्रतिष्ठानच्या उत्सवात तब्बल २१ लाख रुपयांची बक्षिसे जाहीर केली आहेत. बाळकुमच्या मानाच्या हंडीसाठीही स्वतंत्र बक्षीस ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, मनसेच्या दहीहंडीत चार पथके दहा थर रचण्याचा प्रयत्न करणार असून बारा पथके नऊ थरांचे आव्हान स्वीकारणार आहेत. ठाण्यातील नऊ थरांच्या पथकासाठी पाच लाख ११ हजार, तर मुंबईतील पथकासाठी दाेन लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. कोपरीतील उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सवात विजेत्या पथकाला एक लाख ११ हजार १११ रुपये, तर नऊ थरांसाठी ५५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीतही गोविंदा पथकांसह मनोरंजनाची मेजवानी असणार असून ‘हास्य जत्रा’ फेम कलाकारांची उपस्थिती आकर्षण ठरणार आहे.
ठाणेकर अनुभवणार छोट्या दहीहंडीचा थरार
ठाण्यात यंदा मोठ्या दहीहंड्यांच्या लाखो रुपयांच्या बक्षिसांसह गल्लीबोळातील छोट्या दहीहंड्यांचाही उत्साह पाहायला मिळणार आहे. स्थानिक मंडळे आणि सेवाभावी संस्थांच्या छोट्या दहीहंडी उत्सवांनाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात मोठ्या दहीहंड्यांसोबत छोट्या हंड्यांचाही थरार रंगणार आहे. मोठ्या दहीहंड्यांची चुरस रंगत असतानाच, छोट्या दहीहंड्यांमधून पारंपरिक उत्साह आणि स्थानिक सहभागाची रंगत अनुभवायला मिळणार आहे.
सुरक्षेलाही प्राधान्य
दरम्यान, उंच थरांबरोबरच गोविंदांच्या सुरक्षेलाही आयोजकांकडून प्राधान्य दिले जात आहे. वैद्यकीय पथके, सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.