मालाड-मढ मार्गावर कोंडीचा रोजचा खेळ

मालाड-मढ मार्गावर कोंडीचा रोजचा खेळ
Published on

मालाड-मढ मार्गावर वाहतूक कोंडीचा रोजचा खेळ
महत्त्वाच्या संरक्षण आस्थापनांमुळे वर्दळ वाढली; रस्ता रुंदीकरणाची मागणी

मालाड, ता. ३ (बातमीदार) ः पश्चिम द्रुतगती मार्ग ते मढपर्यंतचा महत्त्वाचा मार्ग ‘व्हीव्हीआयपी’ म्हणून ओळखला जात असला, तरी या मार्गावरील वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते, अनधिकृत पार्किंग, फेरीवाले आणि खड्ड्यांमुळे वाहनचालकांची अक्षरशः कसरत होत आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतूक कोंडीतून मुक्त होणार तरी कधी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पश्चिम द्रुतगती मार्गावरून मालाड सबवेमार्गे साईनाथ रोड, स्वामी विवेकानंद मार्ग आणि पुढे मार्वे रोडमार्गे मढ असा हा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर लष्कराचे केंद्र, नौदलाचे आयएनएस हमला, मार्वे येथील एचबीटीसीचे प्रशिक्षण केंद्र तसेच मढ येथील हवाई दलाचे रडार केंद्र अशी महत्त्वाची आस्थापने आहेत. त्यामुळे लष्करातील वरिष्ठ अधिकारी, जवान तसेच अत्यावश्यक सरकारी यंत्रणांची या मार्गावर सतत ये-जा असते; मात्र मालाड सबवे ते एसव्ही रोड हा टप्पा पार करताना वाहनचालकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यानंतर ओर्लेम परिसरात अरुंद रस्ता आणि वाढलेली वाहनांची संख्या यामुळे वाहतूक संथ होते. पुशे मीठ चौकी, लिंक रोड परिसरातील सिग्नल आणि मालवणी क्रमांक एक येथील वाहतूक सिग्नलवरही मोठ्या प्रमाणात कोंडी होते. मालवणी क्रमांक एकनंतर मार्वे टी-जंक्शन ते मढ जेट्टीपर्यंतचा रस्ता अनेक ठिकाणी अरुंद आहे. या मार्गावर एखादे वाहन बंद पडले, अपघात झाला किंवा झाड कोसळले तर संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळित होऊन कोंडीत आणखी भर पडते.

अनधिकृत पार्किंग आणि फेरीवाल्यांचा अडथळा
या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनधिकृत पार्किंग केले जाते. त्यातच फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि ठिकठिकाणी पडलेले खड्डे यामुळे रस्त्याची वाहतूक क्षमता कमी होत आहे. सरकारी दप्तरी या मार्गाला ‘व्हीव्हीआयपी’ दर्जा असला, तरी प्रत्यक्षात मात्र वाहनचालकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ‘व्हीव्हीआयपी’ दर्जा केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष रस्त्यावरही दिसण्यासाठी प्रशासनाने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

चित्रीकरण वाढल्याने वाहतूक कोंडीत भर
मढ परिसर चित्रपट, मालिका आणि विविध जाहिरातींच्या शूटिंगचे प्रमुख केंद्र बनले आहे. त्यामुळे कार, दुचाकी तसेच शूटिंगचे साहित्य वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर झाली आहे. कोंडीमुळे अत्यावश्यक सेवांनाही फटका बसत असून रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या वाहनांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते.

रस्ता रुंदीकरणासह कायमस्वरूपी उपायांची गरज
वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी रस्ता रुंदीकरण, अनधिकृत पार्किंग आणि फेरीवाल्यांवर प्रभावी कारवाई, खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती तसेच रस्त्याची नियमित देखभाल आवश्यक आहे. मालवणी परिसरातून वीर अब्दुल हमीद मार्गाने मार्वे रोडवर येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था उभारण्याचीही गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com