

घणसोलीत नागरिकांचा ‘हंडा मोर्चा’
घणसोली विभाग कार्यालयावर आंदोलन
आंघोळ व दात घासत प्रशासनाचा अनोखा निषेध
वाशी, ता. ३ (बातमीदार) ः घणसोली सेक्टर ६, ७, ८ आणि ९ परिसरात गेल्या आठ दिवसांपासून होत असलेल्या अपुऱ्या व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त नागरिकांचा अखेर उद्रेक झाला. या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिंदे गट नगरसेवक सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता. ३) घणसोली विभागीय वॉर्ड कार्यालयावर ‘हंडा मोर्चा’ काढण्यात आला.
घणसोली परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापरासाठीही नागरिकांची मोठी कसरत सुरू आहे. या परिस्थितीची दखल घेत नगरसेवक सौरभ शिंदे यांनी नागरिकांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली; मात्र टँकरचे पाणी किती दिवस पुरणार? पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी प्रशासनाची नाही का, असा सवाल उपस्थित करीत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पाणीप्रश्नाकडे प्रशासनाचे गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने डोक्यावर हंडे घेऊन घणसोली विभागीय कार्यालयावर धडकले. ‘पाणी द्या, पाणी द्या’, ‘नागरिकांना वेठीस धरणे बंद करा’ अशा घोषणा देत आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाला नगरसेवक सौरभ शिंदे, समाजसेवक सुनील मस्कर यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंघोळ आणि दात घासत अनोखे आंदोलन
या आंदोलनाचे विशेष आकर्षण म्हणजे नागरिकांनी केलेला अनोखा निषेध. पाणीटंचाईमुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, हे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी काही नागरिकांनी आंदोलनस्थळीच आंघोळ केली, तर काहींनी हातात टूथब्रश घेऊन दात घासत निषेध व्यक्त केला. या अनोख्या आंदोलनाची घणसोली परिसरात दिवसभर जोरदार चर्चा रंगली.
पोलिसांचा फौजफाटा तैनात
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घणसोली विभागीय कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. या वेळी आंदोलक नागरिकांनी विभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली. गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांना पाण्यासाठी होणारा त्रास त्वरित थांबवावा, अशी जोरदार मागणी या वेळी करण्यात आली. नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत, पाणीप्रश्न तातडीने सोडविण्यात आला नाही, तर भविष्यात यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असे सांगितले.
गरज पडल्यास राजीनामा देणार
या वेळी नगरसेवक सौरभ शिंदे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तसेच पाणीप्रश्नात होत असलेल्या राजकीय हस्तक्षेपावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी संतप्त शब्दांत सांगितले, की जे काही राजकारण करायचे असेल ते आमच्यासोबत करा; मात्र गरीब जनतेला वेठीस धरू नका. नागरिकांचा पाणीप्रश्न सुटत असेल, तर गरज पडल्यास मी राजीनामा देण्यासही तयार आहे, असे स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.