डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक

डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक
Published on

डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक
लोकल उशिराने धावल्याने घोषणाबाजी

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : मध्य रेल्वेच्या लोकल सेवांचे बिघडलेले वेळापत्रक आणि वारंवार होणाऱ्या विलंबामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या संतापाचा गुरुवारी (ता. ३) उद्रेक झाला. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास लोकल उशिराने धावत असल्याने संतप्त प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी केली. या घटनेचा व्हिडिओ काही प्रवाशांनी मोबाईलमध्ये चित्रित करून समाजमाध्यमांवर प्रसारित केला असून, तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवली महत्त्वाचे स्थानक असून, दररोज हजारो प्रवासी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. सकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकलच्या वेळापत्रकात वारंवार होणाऱ्या बदलांचा आणि विलंबाचा थेट परिणाम प्रवाशांच्या दैनंदिन वेळापत्रकावर होत आहे.
आम्ही नियमितपणे तिकीट, पास काढून लोकलने प्रवास करतो; मात्र लोकल उशिराने धावत असल्याने कामावर पोहोचण्यास उशीर होतो. त्याचा परिणाम लेट मार्कवर होतो आणि महिन्याच्या पगारातून पैसे कापले जातात. हा आर्थिक फटका आम्हाला रेल्वे प्रशासन भरून देणार आहे का, असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला.
लोकलच्या वेळापत्रकाचे योग्य नियोजन करण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोपही प्रवाशांनी या वेळी केला. प्रवाशांकडून नियमित तिकिटाचे पैसे घेतले जातात, मग वेळेवर सेवा देण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल करीत प्रवाशांनी प्रशासनाला धारेवर धरले.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर डोंबिवली स्थानकातील प्रवाशांच्या समस्या आणि लोकल सेवेतील विलंबाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. डोंबिवलीकर प्रवाशांच्या या समस्यांकडे रेल्वे प्रशासन गांभीर्याने कधी पाहणार आणि लोकल सेवा वेळेवर कधी धावणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com