एमडी तस्करीला ठाणे पोलिसांचा ‘डबल झटका’; ५.६६ कोटींचा मुद्देमाल जप्त

एमडी तस्करीला ठाणे पोलिसांचा ‘डबल झटका’; ५.६६ कोटींचा मुद्देमाल जप्त
Published on

एमडी तस्करीत सख्ख्या भावांसह चौघांना अटक
ठाणे पोलिसांकडून ५.६६ कोटींचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : अमली पदार्थ तस्करीविरोधात ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने दोन स्वतंत्र कारवाया करीत चार जणांना अटक केली. या कारवाईत तब्बल दोन किलो ८२३ ग्रॅम एमडी (मॅफेड्रॉन) जप्त करण्यात आले. या अमली पदार्थासह एकूण पाच कोटी ६६ लाख ३७ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. तपासात जप्त केलेला मुद्देमाल गुजरात आणि पश्चिम बंगाल या राज्यातून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे अमली पदार्थविरोधी पथकाचे प्रमुख सचिन गायकवाड यांना काही जण एमडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घोडबंदर रोड परिसरातील गायमुख बसथांब्याजवळ सापळा रचून मिरा रोड येथील मोजीम अब्दुल्ला शेख (वय ४१) आणि तबरेज अब्दुल्ला शेख (५१) या सख्ख्या भावांना मंगळवारी (ता. १) अटक केली. त्यांच्या ताब्यातून ५६७ व ५६ ग्रॅम तसेच स्कूटरच्या डिक्कीत लपविलेला एक किलो ४८ ग्रॅम असा एकूण एक किलो ६७१ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला. त्याची किंमत सुमारे तीन कोटी ३४ लाख २० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाअंतर्गत हा माल गुजरातमधून आणल्याचे उघड झाले. तसेच काही नावे पुढे आल्याचेही सांगण्यात आले.

दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी कोपरी येथील बीएसएनएल कार्यालयाजवळ गोवंडी येथील अब्दुल रेहमान मोईद्दीन कादर शेख (३३) याच्याकडून एक किलो १५२ ग्रॅम एमडी, किंमत दोन कोटी ३० लाख ४० हजार रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणाच्या तपासात एमडीचा पुरवठा करणाऱ्या नवी मुंबईतील आफ्रिदी मोहमद वली शेख (२७) यालाही अटक करण्यात आली. हा मुद्देमाल रेल्वेतून पश्चिम बंगाल येथून आल्याचे समोर आले. आफ्रिदी शेख हा नायजेरियन व्यक्तीच्या संपर्कात असल्याचेही तपासात समोर आल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com