युवा पिढीचे भवितव्य आणि ''व्यसनमुक्त नवी मुंबई''चा संकल्प

युवा पिढीचे भवितव्य आणि ''व्यसनमुक्त नवी मुंबई''चा संकल्प
Published on

युवा पिढीचे भवितव्य आणि ‘व्यसनमुक्त नवी मुंबई’चा संकल्प
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३ : नवी मुंबईसारख्या आधुनिक आणि वेगाने विकसित होणाऱ्या शहरासमोर आज सर्वांत मोठे आव्हान कोणते असेल, तर ते म्हणजे अमली पदार्थांच्या भयंकर विळख्यातून आपल्या युवा पिढीला सुरक्षित ठेवणे. तंत्रज्ञान आणि आधुनिक जीवनशैलीच्या प्रवाहात भरकटणाऱ्या तरुणाईला वेळेत सावरले नाही, तर भौतिक विकास निरर्थक ठरू शकतो. याच पार्श्वभूमीवर वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित ‘मिशन युथ : व्यसनमुक्त नवी मुंबई’ हा उपक्रम केवळ एक सोहळा न ठरता शहराच्या भविष्याला नवी दिशा देणारा एक महत्त्वाचा सामाजिक टप्पा ठरला आहे. आमदार मंदा म्हात्रे यांच्या दूरदृष्टीतून आणि भाजप महामंत्री नीलेश म्हात्रे यांच्या प्रभावी संयोजनातून साकार झालेली ही मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रग्ज फ्री इंडियाच्या संकल्पनेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांना स्थानिक पातळीवर दिलेला एक ठोस प्रतिसाद आहे.
केवळ जनजागृती नव्हे, तर कृतीशील लढा व्यसनाधीनता ही केवळ एका व्यक्तीची किंवा कुटुंबाची वैयक्तिक समस्या नसून, ती संपूर्ण समाजाची रचना आतून पोखरत जाणारी वाळवी आहे. कार्यक्रमास हजारो तरुण-तरुणी, विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांनी लावलेली उपस्थिती हे स्पष्ट करते, की या समस्येविरुद्ध समाज एकत्र येण्यास तयार आहे. मंदा म्हात्रे यांनी उपस्थितांशी साधलेला थेट संवाद राजकीय औपचारिकतेच्या पलीकडचा होता. नवी मुंबईतील प्रत्येक घर व्यसनमुक्त राहावे आणि तरुणांचे भवितव्य सुरक्षित व्हावे, हा त्यांनी व्यक्त केलेला निर्धार प्रशासकीय आणि सामाजिक यंत्रणांना अधिक जबाबदार बनवणारा आहे.
पालकांचे उत्तरदायित्व आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ तरुणांना उपदेश न देता, कुटुंबाच्या भूमिकेवरही प्रकाश टाकण्यात आला. मुलांच्या वर्तनातील बदल वेळेत ओळखणे आणि त्यांना मानसिक आधार देणे हे पालकांचे पहिले कर्तव्य ठरते. क्राईम ब्रँच नार्कोटिक्स सेलचे अधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि समाजसेवकांच्या सहभागामुळे या अभियानाला व्यावहारिक व वैचारिक अधिष्ठान मिळाले.

सामूहिक शपथ
सामूहिक शपधेतून उज्ज्वल भविष्याकडे सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये जमलेल्या हजारो नागरिकांनी घेतलेली सामूहिक शपथ ही केवळ शब्दांची औपचारिकता नव्हती, तर तो नवी मुंबईला सुरक्षित आणि सशक्त बनवण्याचा एक सामूहिक हुंकार होता. युवा पिढीच्या ऊर्जेला शिक्षण, कौशल्य आणि निरोगी जीवनशैलीकडे वळवणे हाच या समस्येवरील खरा आणि कायमस्वरूपी उपाय आहे. मिशन युथच्या माध्यमातून सुरू झालेला हा लढा नवी मुंबईला पूर्णपणे व्यसनमुक्त करेपर्यंत असाच निरंतर चालू राहणे काळाची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com