दादरच्या बाजारात पर्यावरणपूरक मखरांची धूम

दादरच्या बाजारात पर्यावरणपूरक मखरांची धूम
Published on

दादरच्या बाजारात पर्यावरणपूरक मखरांची धूम
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची गर्दी; विविध आकर्षक देखावे उपलब्ध

रजनीकांत साळवी ः सकाळ वृत्त सेवा
प्रभादेवी, ता. ४ ः गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नाना तऱ्हेची डोळे दिपतील अशी आकर्षक मखरे दादरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आली असून, पर्यावरणपूरक मखरांना ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे.
दादर येथील बाजारपेठेत सनबोर्ड, लाकूड, फोम, फायबर ग्लास मटेरियल, कपडा, आरसा, चटई, रबर शीट, कृत्रिम फुले यांचा वापर करून सुंदर साकारलेली पर्यावरणपूरक मखरे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.
सध्या सर्वाधिक चालणारा शिव वॉटरफॉल देखावा असलेल्या मखरांची सर्वाधिक विक्री होत असल्याचे हरदेव आर्टचे मालक रुणा दबडे यांनी सांगितले. नंदीच्या मुखातून पडणारे पाणी, पिलरमध्ये दाखविण्यात आलेला वॉटरफॉल अशी सुंदर कलाकृती असलेली मखरे या प्रदर्शनातून पाहायला मिळत आहेत. तर शिव आसन, विठू माउली, गणराज आसन, कोणार्क मंदिर, शिश महल, गोल घुमट, जटाधारी शंकर आसन, मोर आसन, मीनाक्षी टेम्पल, अष्टविनायक मंदिर अशी सुंदर कलाकृती असलेली मखरे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.
सजावटीसाठी दीड फुटापासून ते ३.५ फुटापर्यंतच्या मूर्तींसाठीचे देखावे, मखर १,२०० रुपयांपासून ते २५ हजारांपर्यंत मिळत असल्याचे रुणा यांनी सांगितले.
गणपती सजावटीसाठी लागणारी विविध प्रकारची कृत्रिम फुले, आकर्षित करणाऱ्या फुलांची तोरणे, माळा, फ्लॉवर स्टॅन्ड, देखावे, मखर एकाच ठिकाणी मिळत असल्याने खरेदीसाठी दादरमध्ये ग्राहकांची गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.

ग्राहकांना परवडतील आणि पसंत पडतील अशी पर्यावरणपूरक मखरे आम्ही गेली कित्येक वर्षे विक्रीसाठी ठेवत असून, दूरहून ग्राहक दादरमध्ये खरेदीसाठी येत आहेत.
- रुणा दबडे, विक्रेते

आम्ही दरवर्षी सजावटीसाठी पर्यावरणपूरक मखरांची निवड करतो. दादरमध्ये वेगवेगळ्या आकारांमध्ये आणि आकर्षित करतील अशी पर्यावरणपूरक मखरे उपलब्ध असल्याने सोयीचे ठरत आहे.
- अमित शिंदे, ग्राहक

यंदा पर्यावरणाचा विचार करून प्लॅस्टिक, थर्माकोलला पर्याय म्हणून पर्यावरणपूरक मखर खरेदी केले. आकर्षक सजावट, टिकाऊपणा आणि पर्यावरणाची काळजी या तिन्ही गोष्टींचा सुंदर मेळ या मखरामध्ये पाहायला मिळतो.
- विजय राय, ग्राहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com