पनवेलमध्ये बदलत्या काळाची दहीहंडी!

पनवेलमध्ये बदलत्या काळाची दहीहंडी!
Published on

पनवेलमध्ये बदलत्या काळाची दहीहंडी!
नागरीकरण, जागेची कमतरता आणि न्यायालयीन निर्बंधांचा परिणाम; नव्या आयोजकांनी घेतली उत्सवाची धुरा

वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ४ (बातमीदार) ः परिसरात यंदा दहीहंडी उत्सवाची मोठी धूम पाहायला मिळत असली, तरी काही वर्षांपूर्वी गाजणाऱ्या अनेक पारंपरिक दहीहंड्या आता इतिहासजमा झाल्या आहेत. वाढते नागरीकरण, मोकळ्या जागांची कमतरता, न्यायालयाचे निर्बंध आणि बदललेली राजकीय परिस्थिती यामुळे अनेक जुन्या दहीहंडी उत्सवांचे थर आता थंडावले आहेत. नव्या आयोजकांनी ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला असला, तरी जुन्या उत्सवांची उणीव जाणवत आहे.
पनवेल शहरातील शिवाजी चौकात महात्मा फुले हातगाडी संघटनेच्या वतीने मोठ्या उंचीची आणि आकर्षक बक्षिसांची दहीहंडी आयोजित केली जात होती. या दहीहंडीला परिसरात विशेष महत्त्व होते; मात्र गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा बंद झाली आहे. नवीन पनवेलमधील सेक्टर सातच्या चौकात नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या माध्यमातून ‘रामश्री दहीहंडी’ आयोजित केली जात होती. सुरुवातीला रस्त्यावर हा उत्सव होत असे; मात्र न्यायालयीन निर्देशांनंतर पोलिस ठाण्यासाठी राखीव असलेल्या लगतच्या भूखंडावर दहीहंडी हलविण्यात आली. त्यानंतर मात्र हा उत्सवही आता भरताना दिसत नाही. शिवा कॉम्प्लेक्स येथे नामदेव फडके यांच्या पुढाकाराने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके संघटनेच्या माध्यमातून दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात होता; मात्र परिसरातील जागेची समस्या निर्माण झाल्याने या ठिकाणीही दहीहंडीचे थर आता लागत नाहीत. कळंबोलीतील बीमा कॉम्प्लेक्स सोसायटीच्या वतीने आयोजित केली जाणारी दहीहंडीही जागेअभावी बंद झाली आहे.
कळंबोलीतील हनुमान मंदिर परिसरात मात्र पारंपरिक पद्धतीने दहीहंडीची परंपरा सुरू आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली डोळ्यांवर पट्टी बांधून दहीहंडी फोडण्याचा उपक्रम येथे आयोजित केला जातो. तक्का परिसरातील माजी नगरसेवक तेजस कांडपिळे यांच्या वतीने मोठ्या रकमेच्या बक्षिसांची दहीहंडी आयोजित केली जात होती. या उत्सवासाठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनाही आमंत्रित केले जात असे; मात्र यंदा या दहीहंडीचे बॅनर किंवा विशेष नियोजन अद्याप दिसून आलेले नाही. कामोठे वसाहतीत हॅप्पी सिंग यांच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी दहीहंडी यंदा मंडळातील एका सदस्याच्या निधनामुळे रद्द करण्यात आली आहे. याशिवाय प्रदीप भगत आणि गोपीनाथ भगत यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून आयोजित होणारी दहीहंडीही यंदा परिसरात दिसून येत नाही. भाजप कामोठे मंडळाच्या वतीने मात्र दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

अहिल्यानगरच्या खासदारांची सर्वाधिक रकमेची दहीहंडी!
कामोठे सेक्टर २० येथील लोकनेते दि. बा. पाटील मैदानावर अहिल्यानगर दक्षिणचे खासदार नीलेश लंके यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून यंदाही दहीहंडीचे आयोजन केले आहे. १५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांच्या बक्षिसांची या दहीहंडीत लयलूट होणार आहे. मुंबई परिसरात मोठ्या संख्येने पारनेर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिक वास्तव्यास असल्याने २०१९ पासून या भागात मोठ्या स्वरूपात दहीहंडीचे आयोजन केले जात आहे. याशिवाय पारनेर रहिवासी संघाच्या वतीने कामोठे सेक्टर ३६ येथे ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे.

विक्रांत पाटील यांचा सात ठिकाणी उत्सव!
आमदार विक्रांत पाटील यांच्या पुढाकाराने पनवेल पालिका क्षेत्रात यंदा सात ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध ठिकाणी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवली असून, उत्सवाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनसंपर्क साधण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. आगामी २०२९च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आतापासूनच संघटनात्मक बांधणी आणि जनसंपर्कावर भर दिला जात असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com