

डीजेचा दणदणाट, लेझरचा धिंगाणा बंद!
नवी मुंबई पोलिसांचा दणकेबाज निर्णय; नियम मोडल्यास थेट कारवाईचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ : गणेशोत्सवाच्या काळात कानठळ्या बसवणारा डीजेचा आवाज आणि डोळ्यांना इजा पोहोचवणाऱ्या लेझर लाइटचा त्रास रोखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी अत्यंत कठोर निर्णय घेतला आहे. शहरात डीजे आणि लेझर बीम लाईटच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाईचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. बंदी घालण्याबाबतच्या नोटिसा देण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
अमित काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सर्व गणेश मंडळे, डीजे व्यावसायिक आणि डेकोरेटर्स यांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलिसांच्या या भूमिकेचे सर्व रहिवासी व ज्येष्ठ नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. धार्मिक उत्साहाला विरोध नाही, पण उत्सवाच्या नावाखाली कायदा आणि नागरिकांचे आरोग्य धाब्यावर बसवणाऱ्यांविरुद्ध कोणतीही गय केली जाणार नाही, असा सज्जड दमच पोलिसांनी दिला आहे.
...तर गुन्हे दाखल करून साहित्य जप्त
सर्व गणेश मंडळांकडून उत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषण आणि सुरक्षेच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन केले जाईल, याचे कायदेशीर हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे. डीजे व्यावसायिक आणि डेकोरेटर्स यांच्याकडून डीजे किंवा लेझर लाईटच्या कोणत्याही कामाच्या ऑर्डर घेणार नाही, असे लिखित वचनपत्रच पोलिस प्रशासन लिहून घेत आहे. नियम मोडणाऱ्या मंडळांवर आणि डीजे चालकांवर थेट गुन्हे दाखल करून साहित्य जप्त करण्याचा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
नागरिकांकडून स्वागत, मंडळांकडून नाराजी
दरवर्षी गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये चालणारा बेफाम आवाज, डीजेचा छातीचे ठोके चुकवणारा बेस आणि लेझरचे डोळ्यांवर दुष्परिणाम करणारे झोत यामुळे लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना असह्य त्रास सहन करावा लागतो. लेझरच्या तीव्र किरणांमुळे नागरिकांच्या डोळ्यांना गंभीर इजा होण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उत्सवाच्या नावाखाली चालणारा हा धुडगूस थांबवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेचे सामान्य नागरिकांमधून जोरदार स्वागत होत आहे. गणेशोत्सव मंडळांकडून मात्र या निर्णयामुळे नाराजीचा सूर उमटत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.