रस्ते दुरुस्तीसाठी खर्चाचा घाट

रस्ते दुरुस्तीसाठी खर्चाचा घाट
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : पावसाच्या सरी बरसताच ठाणे शहरातील रस्त्यांची अवस्था पुन्हा एकदा उघडी पडली आहे. प्रमुख रस्ते असोत, चौक असोत की पूल आणि वाहतुकीचे महत्त्वाचे मार्ग, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे ठाणेकरांचा प्रवास अक्षरशः खडतर झाला आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावला असून, दुचाकीस्वारांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाणे महापालिका प्रशासनाने रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी दोन कोटींचा खर्च करण्याचा घाट घातला आहे.

रस्ते दुरुस्ती (मुख्यालय) या लेखाशीर्षातून हा निधी खर्च करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. दुरुस्तीच्या कामांसाठी आगाऊ निविदा मागविण्यासह दोन कोटींचे दायित्व स्वीकारण्यास सर्वसाधारण सभेची मंजुरी मागण्यात आली आहे. नगर अभियंत्यांनी हा प्रस्ताव सादर केला असून, मूळ प्रस्तावावर महापालिका आयुक्तांची स्वाक्षरीआहे.

ठाणे महापालिका हद्दीत विविध प्रकल्पांमुळे शहरातील अनेक मार्गांवर सातत्याने कामे सुरू आहेत. काही रस्ते आणि पूल संबंधित यंत्रणांकडून महापालिकेकडे हस्तांतरितही झाले आहेत. मात्र, रस्त्यांची जबाबदारी महापालिकेकडे आल्यानंतर त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्नही पालिकेच्या माथी आला आहे. पावसाने रस्त्यांची अवस्था बिकट केल्यानंतर आता प्रशासनाला पुन्हा एकदा खड्डे बुजविण्यासाठी निधीची तरतूद करावी लागत आहे.

शहरातील प्रमुख वाहतूक मार्गांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे अनेक खड्ड्यांची खोली लक्षात येत नसल्याने वाहनचालकांची कसरत होत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हे खड्डे जीवघेणे ठरण्याची शक्यता आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी होत असून, काही ठिकाणी कोंडीची समस्याही निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करण्याची गरज असल्याचे प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले आहे.

कोट्यवधींचा खर्च कुठे जातो?
ठाण्यातील खड्ड्यांचा प्रश्न नवीन नाही. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की रस्त्यांची चाळण होते आणि त्यानंतर खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेकडून निधीची तरतूद केली जाते. दुरुस्ती होते, खड्डे बुजविले जातात; मात्र पुढील पावसाळ्यात पुन्हा त्याच रस्त्यांवर खड्डे दिसू लागतात. त्यामुळे दरवर्षी दुरुस्तीवर होणारा खर्च नेमका किती आणि त्यातून रस्ते किती दिवस टिकतात, असा सवाल आता ठाणेकरांकडून उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com