

श्रीवर्धन एसटी आगाराची युवासेनेकडून पाहणी
प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर मारले ताशेरे
श्रीवर्धन, ता. ४ (बातमीदार) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा, यासाठी युवासेना श्रीवर्धन व म्हसळा तालुक्याच्या वतीने मंगळवारी (ता. १) श्रीवर्धन एसटी आगाराची पाहणी करण्यात आली. या वेळी आगारातील अपुऱ्या सुविधा, दुरुस्तीतील दिरंगाई आणि कर्मचाऱ्यांची होणारी अडवणूक यावरून युवासेनेने आगाराच्या भोंगळ कारभारावर तीव्र आक्षेप नोंदवला. येत्या चार दिवसांत समस्यांचा निपटारा न झाल्यास प्रशासनाला निवेदन देऊन आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
गणेशोत्सवात मुंबईसह इतर शहरांतून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी दाखल होतात. या पार्श्वभूमीवर आगारातील बसची नियमित देखभाल, ब्रेक, टायर, लाईट व स्टेअरिंगची काटेकोर तांत्रिक तपासणी करूनच मार्गावर बस सोडाव्यात, अशी मागणी युवासेनेने केली. बाहेरून येणाऱ्या अतिरिक्त बसचीही योग्य तपासणी करण्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली.
या पाहणी दौऱ्यात युवासेना म्हसळा तालुका अधिकारी कौस्तुभ उर्मिला विलास करडे, श्रीवर्धन तालुका अधिकारी निकेत मंगेश कोसबे, शिवसेना शहरप्रमुख शिवराज चाफेकर, महिला आघाडीच्या प्रियांका कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते. आगामी काळात कामगारांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
वर्कशॉपमध्ये गुडघाभर पाणी
पाहणीदरम्यान वर्कशॉपमधील कामगारांच्या गंभीर समस्या समोर आल्या. तुटपुंजे मनुष्यबळ, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव, वर्कशॉपमध्ये साचणारे पावसाचे पाणी, अपुरा प्रकाश आणि पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृहांचा अभाव यामुळे कामगारांचे हाल होत असल्याचे दिसून आले. आवश्यक सुटे भाग वेळेवर उपलब्ध होत नसल्याने दुरुस्तीच्या कामात अडचणी येत असल्याच्या तक्रारी कामगारांनी मांडल्या. या सर्व प्रकाराबाबत युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित निरीक्षकांना जाब विचारला.
मंत्री अन् पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी
श्रीवर्धन मतदारसंघात मंत्री व पालकमंत्र्यांचे दौरे होत असतानाही आगारातील मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष आगाराला भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
छायाचित्र : श्रीवर्धन आगारात पाहणी करताना युवासेवा अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.