खड्डेमुक्त रस्त्यांवरून होणार गणेश आगमन

खड्डेमुक्त रस्त्यांवरून होणार गणेश आगमन
Published on

खड्डेमुक्त रस्त्यांवरून होणार गणरायाचे आगमन
रोड पेट्रोलिंग, जिओपॉलिमरने रस्ते दुरुस्तीचा धडाका
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीगणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जन मार्गांवर भाविक व मिरवणुकांना खड्ड्यांचा फटका बसू नये, यासाठी नवी मुंबई पालिकेने कंबर कसली आहे. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अभियांत्रिकी विभागाने रस्ते दुरुस्तीची विशेष मोहीम हाती घेतली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि रोड पेट्रोलिंगच्या माध्यमातून शहरातील रस्ते सुस्थितीत आणण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरू आहे.
शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील रस्त्यांची पाहणी करण्यासाठी कार्यकारी अभियंते आणि त्यांच्या अधीनस्त अभियंत्यांची विभागनिहाय विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. रोड पेट्रोलिंग या संकल्पनेअंतर्गत ही पथके आपापल्या क्षेत्रातील रस्त्यांची प्रत्यक्ष फिरून पाहणी करीत आहेत. रस्त्यांवरील खड्डे, खराब झालेले पृष्ठभाग, उंच-सखल भाग तसेच ड्रेनेज व मॅनहोल्सच्या झाकणांची स्थिती तपासून तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेतली जात आहेत. सध्या पावसामुळे रस्त्यांवरील खड्डे जिओ-टॅग करून ते बुजवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचून ते पुन्हा उखडू नयेत म्हणून मास्टिक जिओपॉलिमर आणि कोल्डमिक्सचा वापर करून तात्पुरती पण मजबूत दुरुस्ती केली जात आहे. पावसाने उघडीप देताच या ठिकाणी नियमित डांबरीकरणाची कायमस्वरूपी कामे पूर्ण केली जाणार आहेत. गणपतीच्या स्वागतासाठी नवी मुंबईचे रस्ते सज्ज होत असून, प्रशासनाच्या या तत्परतेमुळे गणेशभक्तांचा प्रवासातील विघ्नांचा ताण नक्कीच हलका होणार आहे.

पर्यावरणपूरक साजरे करण्याचे आवाहन
गणेशोत्सवाच्या काळात महापालिकेच्या या मोहिमेला नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे, रस्त्यांवर अनावश्यक अडथळे निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. यंदाचा गणेशोत्सव २०२६ हा पूर्णपणे पर्यावरणपूरक, प्लॅस्टिकमुक्त, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी संयुक्तपणे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com