

पंकज रोडेकर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : समाज माध्यमांवर एखादी पोस्ट व्हायरल होण्यासाठी काही सेकंद पुरेसे असतात; मात्र आक्षेपार्ह मजकूर रोखण्यासाठी पोलिसांना तितक्याच वेगाने हालचाल करावी लागते. ठाणे पोलिसांनी आता याच वेगाला ‘सहयोग पोर्टल’ची जोड दिली असून, विविध समाजमाध्यमांवरील तीन हजार ४७५ वादग्रस्त लिंक हटविण्यासाठी विनंत्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी तीन हजार ८३ लिंक हटविण्यात आल्या असून, ८८.७२ टक्के टेक-डाउन पूर्ण झाले आहेत. या मोहिमेत सोशल मीडिया सेलने (लॅब) आघाडी घेतली आहे. सेलने १०३ टेक-डाउन विनंत्यांद्वारे तब्बल २ हजार ९४० लिंक हटविण्याची मागणी केली. त्यापैकी २ हजार ६२० लिंकवर कारवाई पूर्ण झाली असून, ८९.१२ टक्के यश मिळाले आहे. समाज माध्यमांवरील आक्षेपार्ह सामग्रीला लगाम घालण्यासाठी आता पारंपरिक पोलिसिंगसोबत डिजिटल मॉनिटरिंगही पोलिसांच्या कारवाईचे महत्त्वाचे हत्यार बनले आहे.
भिवंडी परिमंडळ -२ ची शंभर टक्के कामगिरी
भिवंडी परिमंडळ-२ कडून करण्यात आलेल्या १५ विनंत्यांमधील सर्व १७ लिंक हटविण्यात आल्या आहेत. सायबर विभागानेही एका विनंतीतील लिंक हटवून शंभर टक्के कामगिरी केली. ठाणे परिमंडळ -१ मधील १४० पैकी १२९, कल्याण परिमंडळ-३ मधील ८० पैकी ७७ आणि उल्हासनगर परिमंडळ-४ मधील १७९ पैकी १५९ लिंक हटविण्यात आल्या. तर वागळे इस्टेट परिमंडळ -५ मध्ये ११८ पैकी ८० लिंकवर कारवाई झाली.
प्रलंबित प्रकरणेही मोठी
वर्तकनगरमध्ये १९ आणि कापूरबावडीत १५ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याशिवाय बदलापूर पूर्व, शिवाजीनगर, मुंब्रा, उल्हासनगर, हिललाईन, नौपाडा, राबोडी, बाजारपेठ, खडकपाडा, वागळे इस्टेट आणि कासारवडवली येथेही काही प्रकरणे प्रलंबित आहेत. एकूण ४५४ विनंत्या, ३ हजार ४७५ लिंक आणि ३ हजार ०८३ टेक-डाउन अशी ठाणे पोलिसांच्या डिजिटल कारवाईची आकडेवारी आहे.
नेत्याची आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल; दोघांना अटक....
राजकारणातील एका नेत्याच्या आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणे दोघांना चांगलेच महागात पडले. तक्रारीनंतर त्या पोस्टच्या लिंक हटविल्या असून दोघांवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.
सोशल मीडिया सेल तसेच इतर व्यक्तींकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची नोंद घेऊन संबंधित आक्षेपार्ह पोस्ट हटविण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या संबंधितांकडे मागणी केली जाते. त्यानुसार पोस्ट हटविण्याची कार्यवाही केली जाते.
- प्रकाश वारके, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.