नवी तिकीट प्रणाली महिलांसाठी अडचणीची

नवी तिकीट प्रणाली महिलांसाठी अडचणीची
Published on

नवी तिकीट प्रणाली अडचणीची
रायगडमध्ये केवळ ३५ हजार एनसीएमसी कार्डची नोंदणी; कार्ड काढण्यासाठी १४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ४ : गर्दीच्या वेळेत एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तिकीट काढणे सुलभ व्हावे, या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेली एनसीएमसी कार्डची नवी तिकीट प्रणाली रायगड जिल्ह्यात मात्र पहिल्याच दिवसापासून अडचणीची ठरली आहे. ग्रामीण भागातील अनेक महिलांना कार्डचे टॉप-अप कसे करायचे, याची माहिती नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. तर कार्ड असूनही पुरेशी रक्कम उपलब्ध नसल्याने अनेकांना प्रवासाचे तिकीट काढता आले नाही. त्यामुळे या प्रणालीच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संपूर्ण राज्यासह रायगड जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्डद्वारे तिकीट प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला. नियमित एसटी प्रवास करणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांची संख्या जिल्ह्यात सुमारे सात लाखांच्या आसपास आहे; मात्र आतापर्यंत केवळ ३५ हजार महिला व ज्येष्ठ नागरिकांनी एनसीएमसी कार्डची नोंदणी केली आहे. हे प्रमाण खूपच अत्यल्प आहे. त्याचबरोबर ग्रामीण महिलांना ही प्रणाली वापरण्यास अडचणी येत असल्याने १४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती रायगड जिल्हा वाहतूक नियंत्रक डॉ. सुहास चौरे यांनी दिली. महिला प्रवासी अद्याप या प्रणालीच्या बाहेर आहेत. यापूर्वी महिलांना एसटी प्रवासात अर्ध्या तिकिटाची सवलत मिळत होती; मात्र नवीन प्रणाली सुरू झाल्यानंतर एनसीएमसी कार्ड नसलेल्या महिलांना पूर्ण तिकीट काढावे लागत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. पहिल्याच दिवशी अनेक महिलांना पूर्ण भाडे भरावे लागल्याने त्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला असून पूर्वीच्या रोख रकमेत तिकीट काढण्याची पद्धत कायम करावी, असे जिल्ह्यातील महिलांचे म्हणणे आहे.
---
ग्रामीण महिला प्रवासी गोंधळात
ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी नोकरी, व्यवसाय तसेच विविध कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने महिला प्रवास करतात. त्यांच्यापैकी अनेक महिलांना एनसीएमसी कार्ड काढण्याची किंवा त्यात पैसे भरण्याची प्रक्रिया माहिती नाही. कार्ड काढलेले असले तरी त्यात पुरेशी रक्कम नसल्यास तिकीट काढता येत नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, नवी प्रणाली प्रवाशांबरोबरच एसटी वाहकांसाठीही नवीन असल्याने सुरुवातीच्या दोन दिवसांत अनेक मार्गांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कार्ड स्वीकारणे, टॉप-अप आणि तिकीट प्रक्रियेसंदर्भात वाहकांनाही अडचणी येत असल्याचे चित्र होते.
---
एनसीएमसी कार्डसाठी मुदतवाढ
या पार्श्वभूमीवर एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी देण्यात आलेली मुदत वाढवून आता १४ सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे; मात्र ग्रामीण भागातील महिलांपर्यंत या प्रणालीची योग्य माहिती पोहोचविणे आणि कार्डच्या वापराबाबत मार्गदर्शन करावे लागणार आहे. सवलत कार्ड काढण्यासाठी मर्यादित केंद्रे आहेत. या ठिकाणी दररोज लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे साधारण सात लाख सवलतीमध्ये प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ट नागरिकांना एनसीएमसी कार्ड केव्हा काढून देण्यासाठी एसटी महामंडळासमोरचे मोठे आव्हान ठरणार आहे.
---
ही प्रणाली सुरू करण्यापूर्वी सवलतीमध्ये प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिकांना कार्डचे वितरण होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याचा वापर कसा करायचा, टॉप-अप कसे मारावे, याची माहिती असणे आवश्यक आहे. याची पूर्तता झाल्यानंतरच ही प्रणाली सुरू करावी.
- सुनील तटकरे, खासदार, रायगड
ALI26B62558
ALI26B62557

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com