

दहीहंडीसाठी तब्बल दोन लाखांची बोली
कोपरखैरणेमध्ये ६२ वर्षांची परंपरा; वेटा यांना सलग सातव्यांदा दहीहंडीचा मान
तुर्भे, ता. ५ (बातमीदार) : कोपरखैरणे गावातील सेक्टर १९ येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडीच्या बोलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यंदाच्या दहीहंडीच्या लिलावात राजेश वेटा यांचा मुलगा हार्दिक यांनी दोन लाख ६५ हजार ५५५ रुपयांची बोली लावत दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला. हार्दिक वेटा यांना यंदा सलग सातव्यांदा हा मान मिळाला आहे.
कोपरखैरणे गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने गेली ६२ वर्षे उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने गावात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या सप्ताहालाही ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला. गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडीची बोली उत्सवातील प्रमुख आकर्षण ठरते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही कोपरखैरणे गावातील श्री राधा-कृष्ण मंदिरातून पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात निघालेली पालखी मिरवणूक श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिराच्या ठिकाणी पोहोचली. त्यानंतर दहीहंडीच्या बोली लिलावाला सुरुवात झाली.
दहीहंडीच्या लिलावासाठी ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये मोठी उत्सुकता होती. बोलीमध्ये सहभागी होत भाविकांनी उत्स्फूर्तपणे रक्कम जाहीर केली. अखेर हार्दिक वेटा यांनी २,६५,५५५ रुपयांची सर्वाधिक बोली लावत दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला. त्यांच्या या विक्रमी बोलीनंतर उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.
धार्मिक उत्सवातून ग्रामविकासालाही हातभार
लिलावातील निधीचा उपयोग धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी केला जातो. यापैकी निम्मी रक्कम श्री राधा-कृष्ण मंदिरातर्फे भंडाऱ्यासाठी वापरली जाते. तर, उर्वरित रक्कम ग्रामविकास मंडळाकडे सुपूर्द करण्यात येते. त्यामुळे दहीहंडीची ही परंपरा केवळ धार्मिक उत्सवापुरती मर्यादित न राहता गावातील सामाजिक आणि विकासात्मक उपक्रमांनाही हातभार लावणार आहे. सहा दशकांहून अधिक काळ सुरू असलेली ही परंपरा आजही ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने जपली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.