

कुर्ल्यात दहीहंडीचा ज्वर!
शिवसेना, मनसे, भाजपच्या गगनचुंबी हंड्या; पावसाच्या रिपरिपीने गोविंदांचा उत्साह शिगेला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : ढोल ताशाचा दणदणाट... गोविंदा रे गोपाळा... आला रे आला गोविंदा आला या गाण्यांचा टिपेला पाहोचलेला सूर...अधूनमधून रिपरिपणारा पाऊस आणि प्रचंड गर्दी असा आगळावेगळा दहीहांडीचा ज्वर आज कुर्ला परिसरात होता. दोन्ही शिवसेना, मनसे, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा सर्वच राजकीय पक्षांनी कुर्ला पश्चिम, कुर्ला पूर्वेला मोठमोठ्या दहीहांड्या उभारल्या होत्या. त्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी मोठी गर्दी केल्याने कुर्ला परिसर गोविंदामय झाला होता.
दहीहांडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुर्ला, चुनाभट्टी परिसरातील गोविंदा पथकांनी सकाळपासूनच सर्वेश्वर मंदिर येथील मानाची हांडी फोडण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर त्यांनी राजकीय पक्षांच्या गगनचुंबी हांड्या फोडण्यासाठी कूच केली. कुर्ला नेहरूनगर येथे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने एस. जी. बर्वे मार्गावर बाजूबाजूला हांड्या उभारल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. शिवेसना आमदार मंगेश कुडाळकर यांनीही येथेच दहीहांडी उभारली होती. त्यामुळे परिसर गोविंदा पथकांच्या गर्दीने फुलून गेला होता. गोविंदा पथकांकडून हांड्यांना सलामी देताचा डीजेच्या तालावर ठेका धरत मोठा जल्लोष केला जात होता. कुर्ला पश्चिमेला स्टेशनजवळ भाजपकडून तर कुर्ला कोर्टाजवळ लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावर माजी आमदार मिलिंद कांबळे यांनी बांधलेल्या हांड्यांनाही मोठी गर्दी होती.
बसच्या रांगा
शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने नेहरूनगर येथे बाजूबाजूलाच मुख्य रस्त्यालगत दहीहांड्या उभारल्या होत्या. त्यामुळे कुर्ला स्थानकापासून जाणाऱ्या बसचा मार्ग पूर्णपणे ब्लाॅक झाला होता. परिणामी बसगाड्यांची एकामागोमाग रांग लागल्याचे चित्र होते. गोविंदा पथकांनी थर लावल्यानंतरच बसला मार्ग करून दिला जात होता. त्यामुळे होणाऱ्या विलंबाबत प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.
बाल गोविंदांची सुरक्षा वाऱ्यावर
गोविंदा पथकांकडून सर्वात वरील थरावर सहा-आठ वर्षांच्या बाल गोविंदांना चढवले जात होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दोर लावणे अपेक्षित होते. याआधी आयोजनकांकडून तशी व्यवस्था केली जात होती. मात्र आज अशी कोणतीच व्यवस्था आयोजकांनी केली नव्हती. त्यामुळे थर लावताना मनोरा कोसळ्यानंतर बाल गोविंदांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.