

दहीहंडीच्या जल्लोषात
ठाणे न्हाऊन निघाले
कृष्णनामाचा जयघोष अन् लाखमोलाच्या हंड्यांसाठी चुरस
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : ‘गोविंदा आला रे...’, ‘बोल बजरंग बली की जय’च्या घोषणांनी दुमदुमणारे रस्ते, ढोल-ताशांच्या तालावर थिरकणारे गोविंदा, उंचच उंच मानवी मनोरे आणि हंडी फुटताच उसळणारा जल्लोष... अशा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात शनिवारी (ता. ५) ठाणे शहराने दहीहंडीचा सण जल्लोषात साजरा केला. लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या हंड्यांसाठी शहरभर आलेल्या पथकांमध्ये दिवसभर चुरस रंगली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाण्यातील विविध दहीहंडी उत्सवांना भेटी देत गोविंदा पथकांचा उत्साह वाढविला.
ठाण्यातील दहीहंडी उत्सवाची सुरुवात सकाळपासून झाली. रहेजा गार्डन येथे आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात रामनगरचा राजा गोविंदा पथकाने नऊ थरांची सलामी देत सर्वांचे लक्ष वेधले. वर्तकनगर येथे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती दहीहंडी उत्सवात ठाणे, मुंबईतील गोविंदा पथकांना नऊ थर रचण्यात यश आले असले, तरी यंदा १० थरांचा थरथराट मात्र हुकल्याचे दिसून आले. एकमेकांच्या खांद्यावर पाय ठेवत गोविंदांनी मानवी मनोरा उभारला आणि हंडीपर्यंत मजल मारताच उपस्थितांनी जल्लोष केला. दहीहंडी थर रचण्याचा किंवा हंडी फोडण्याचा उत्सव नसून, एकजुटीचा आणि सामूहिक शक्तीचा सोहळा मानला जातो. हीच भावना शनिवारी ठाण्यातील विविध मंडळांच्या उत्सवातून अनुभवायला मिळाली.
यंदाच्या उत्सवात महिला गोविंदा पथकांचाही उत्साह विशेष जाणवला. पुरुष पथकांच्या बरोबरीने महिलांनीही आत्मविश्वासाने थर रचत दहीहंडी फोडण्याचे आव्हान स्वीकारले. गोविंदांच्या या सहभागाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. दुपारपर्यंत शहरातील छोट्या-मोठ्या दहीहंड्या फोडल्यानंतर गोविंदा पथकांनी लाखमोलाच्या बक्षिसांकडे मोर्चा वळविला. ठाणे, मुंबई तसेच जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या पथकांमुळे प्रमुख दहीहंडी उत्सवस्थळी गर्दी वाढली.
..............................
उत्सवाची रंगत, शिस्तीची साथ
उत्सवादरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. प्रमुख उत्सवस्थळांवर गर्दीचे नियोजन करण्यात आले होते. दहीहंडीमुळे प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम झाला असला, तरी उत्सवाचा उत्साह मात्र कायम राहिला. दिवसभर थर रचून विविध हंड्या फोडणाऱ्या गोविंदा पथकांनी सायंकाळी काही काळ विश्रांती घेतली. सेवा रस्ते, उद्याने आणि मोकळ्या जागांवर पथकांचे सदस्य विसावले होते. काहींनी सोबत आणलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत पुन्हा जल्लोषात सहभाग घेतला.
...................................
वयाच्या मर्यादेवर दुर्लक्ष
मानवी मनोरे रचताना अखेरच्या थरावर असणाऱ्या गोविंदाला १४ वर्षे वयाच्या अटीचे निर्बंध न्यायालयाने घालून दिले आहेत. असे असताना यंदाच्या दहीहंडी उत्सवात अनेक मंडळांनी रचलेल्या थरात १४ वर्षे वयापेक्षा कमी वयाचे गोविंदा असल्याचे दिसून आले.
................
पावसाच्या हजेरीने गोविंदांमध्ये उत्साह
पावसाने सायंकाळी ४ वाजल्यानंतर हजेरी लावल्याने वातावणात काही अंशी गारवा निर्माण झाला होता. पावसाचे थेंब अंगावर पडल्याने गोविंदांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरल्याचे दिसून आले.
.........................
दहा थरांचे प्रयत्न अपयशी
ठाण्यात गोविंदा पथकांनी १० थरांचा विक्रम गाठण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी पथकांनी १० थरांची रचना करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले; मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे यंदाच्या उत्सवात १० थरांची सलामी पाहायला मिळाली नाही. मागील वर्षी काही पथकांनी १० थर रचण्यात यश मिळवले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.